मुंबई : “आज मुख्यमंत्री एका नाटकाचे दिग्दर्शक वाटत होते. वेगवेगळ्या किरधारात स्वतःला रंगवत होते. यामधून अहंकार दिसत होता. स्वतःला राम किंवा कृष्ण म्हणून तसं होता येत नाही. तुम्ही कर्म काय करता यावर सर्व भूमिका ठरत असतात.”, असे म्हणत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रतिहल्ला केला आहे.


गोरेगावमध्ये ज्या मैदानात युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली, त्याच मैदानात भाजपने आज विजयी संकल्प मेळावा आयोजित केला होता. त्यात मुख्यमंत्र्यांनी शिवेसेनेवर चौफेर हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला शिवसेनेच्या गोटातून अनिल देसाईंच्या रुपाने पहिलीच प्रतिक्रिया आली आहे.

शिवसेना खासदार अनिल देसाई

“कोण सत्याची कास धरतंय आणि कोण चुनावी जुमले देतायत, हे सगळ्यांच्या समोर आहे. लोकसभेनंतर कोणाला अहंकार आणि गर्व कोणाला आला आहे हे जनता पाहतेय. त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काही नाही म्हणून आमचा वचननामा त्यांना दाखवावा लागला. सगळीकडे जाऊन गावगुंड घ्यायचे, ओवाळून टाकलेले लोक भरती करून घ्यायचे आणि आम्हाला गुंड म्हणायचं.”, असा घणाघातही अनिल देसाईंनी केला.

“लोकांचे जीव धोक्यात असताना शिवसेना रस्त्यावर उतरली. विकासाची कामं बघूनचं मुंबईकरांनी आम्हाला सतत निवडून दिलेलं आहे. यावेळेसुद्धा भरघोस मतांनी निवडून देतील.”, असा विश्वास अनिल देसाईंनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर, आमची शक्ती तुम्हाला दिसेलच, त्यांनी त्यांच्या यंत्रणेवर आणि उमेदवार निवडीवर लक्ष द्यावे., असा टोलाही देसाईंनी भाजपला लगावला.