ठाणे : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची आघाडी होईल, अशी अनेकांना आशा होती, परंतु काही कारणास्तव ही आघाडी होऊ शकली नाही. मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढत आहे. दरम्यान ठाण्यात मात्र मनसेची राष्ट्रवादीसोबत आघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.


लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उघडपणे भाजपला विरोध केल्यानंतर अचानक त्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांमधील जवळीक वाढू लागली. त्यानंतर कधी शरद पवारांच्या घरी तर कधी विमानात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेल्या सर्वांनी पाहिल्या. या चर्चांचे फलित विधानसभा निवडणुकीत दिसू लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने ठाणे शहर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनसेच्या अविनाश जाधव यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते जरी नाराज असले तरी नेत्यांना मात्र यात काहीही गैर वाटत नाही. उलट यातच भविष्य असल्याचे ते सांगत आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड याबाबत म्हणाले की, फॅसिझमविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, शेवटी त्यांच्या विरोधात जास्तीत जास्त लोकांना जिंकून द्यायचे आहे.

दरम्यान, मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या अंडरस्टॅन्डिंगमुळे भाजपचे उमेदवार संजय केळकर यांना आव्हान वाटत नाही. गेल्या पाच वर्षांच्या काळात आम्ही केलेल्या कामांमुळे जनता आम्हाला निवडून देईल, असा विश्वास त्यांना वाटतो.

केवळ ठाणे शहर हा एकच मतदारसंघ नाही तर कल्याण पश्चिम, नाशिक, मुंबई आणि इतर काही ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना राष्ट्रवादीने समर्थन दिले आहे. जेणेकरून विरोधातील मतांचे विभाजन होऊ नये.