ही इमारत स्थानिक रहिवाशांनी मे.रिलायन्स रिअल्टर्सचे पार्टनर्स हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी यांना मे 2006 मध्ये पुनर्विकासासाठी दिली होती. इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन विकासकाने 2014 मध्ये त्याचा ताबा फ्लॅटधारकांना दिला. मात्र या इमारतीची अग्निशमन यंत्रणा विकासकाने योग्यरितीने कार्यान्वित केली नाही. नियमानुसार 15 व्या माळ्यावर ठेवण्यात येणाऱ्या रिफ्यूजी एरियामध्ये म्हणजेच मोकळ्या जागेमध्ये भिंत घालून इमारतीतील बी विंग व सी विंग यांना जोडणारा आपत्कालीन मार्ग बंद केला होता.
बिल्डरने इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र व अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र नसतानाही फ्लॅटधारकांना या इमारतीत राहण्यास भाग पाडले होते. त्यांमुळे या आगीच्या दुर्घटनेला हे विकासक कारणीभूत असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
आगीत पाच जणांचा मृत्यू
चेंबुरमधील टिळकनगर परिसरातील सरगम इमारतीत लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. सरगम इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र तोपर्यंत पाच जणांना प्राण गमवावे लागले होते. 72 वर्षीय सुनीता भालचंद्र जोशी, 72 वर्षीय भालचंद्र जोशी, 83 वर्षीय सुमन रामचंद्र जोशी, 52 वर्षीय सरला सुरेश गंगर आणि 83 वर्षीय लक्ष्मीबेन प्रेमजी गंगर यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेत 86 वर्षीय श्रीनिवास रामचंद्र जोशी जखमी आहेत. तर अग्निशमन दलाचे 28 वर्षीय जवान छगन सिंगही दुखापतग्रस्त झाले आहेत.