ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईलचा स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत शिंदे कुटुंबातील चौघं जण भाजले आहेत. एमआय कंपनीच्या रेडमी नोट 5 हँडसेटचा स्फोट झाला.


शहापूरमधील कासार आळीत प्रतीक्षा अपार्टमेंटमध्ये राहणारे राजेश शिंदे सकाळी आपला मोबाईल चार्जिंगला लावून झोपले होते. काही वेळात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला आणि घराला आग लागली.

स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावले आणि आग विझवली. या आगीत शिंदे दाम्पत्य आणि त्यांची दोन मुलं भाजली आहेत. राजू शिंदे, रोशनी शिंदे आणि ऋतुजा व अभिषेक या मुलांवर सध्या ठाण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. घरातील काचा फुटल्या, कपडे आणि स्कूल बॅग जळाल्या, तर वॉशिंग मशिन आणि घरातील इतर साहित्य जळून खाक झालं.

स्फोटाच्या आवाजाने इमारतीतील रहिवासी बाहेर आले आणि शिंदे कुटुंबीयांना त्यांनी इमारतीतून बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवले.