बदलापूर: 'देव तारी त्याला कोण मारी' या घटनेची प्रचिती नुकतीच बदलापूरमध्ये आली आहे. एकता सैनी असं त्या चिमुकलीचं नावं असून वडिलांनीच तिला पुलावरून नदीत फेकून दिलं होतं. या चिमुकलीनं तब्बल १० तास मृत्युशी झुंज दिली. अखेर अग्निशमनच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर तिला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
बदलापूर जवळील एरंजाड गावातील पुलाखाली एक चिमुकली आवाज देत असल्याचं काही गावकऱ्यांना दिसलं. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला आणि अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीला टायरट्यूब बांधून तिला सुखरूप बाहेर काढले ,
काल रात्री ८ वाजताच्या सुमारास ऐकता सैनी या ६ वर्षाच्या चिमुकलीला तिच्या वडिलांनी चप्पल घेऊन देण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर नेलं आणि त्यानंतर तिला एरंजाड गावातील उल्हास नदीच्या पुलावरून खाली फेकलं. मात्र, नदीत पाण्यावर जलपर्णी वनस्पतीचे आच्छादन असल्याने ती त्या जलपर्णी वरच तरंगली. रात्रभर ती त्या नदीच्या पुलाखाली जलपर्णी वनस्पतीवर बसून राहिली. नंतर सकाळी काही नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला याबाबात माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन या चिमुरडीची सुखरुप सुटका केली.