मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरत असून त्याचा काहीसा फायदा भारतीय ग्राहकांना होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर आभाळाला जाऊन पोहोचले होते. मात्र मागील 12 दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत घट होताना पाहायला मिळत आहे.


या 12 दिवसांत पेट्रोलची किंमत 3 रुपये 08 पैसे तर डिझेल 1 रुपये 84 पैशांनी कमी झाले आहेत. मुंबईत आज पेट्रोल 0.30 पैशांनी आणि डिझेल 0.21 पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईत आजचा दर पेट्रोलचे दर 85.24 रुपये आणि डिझेलचे दर 77.40 रुपये प्रतीलिटर आहेत.

तर दिल्लीत पेट्रोल 30 पैशांनी स्वस्त होऊन 79.75 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेलचे दर 20 पैशांनी कमी होऊन 73.85 रुपये प्रती लिटरवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय बजारपेठेत सतत तेलाच्या किंमतीत घट होत असल्याने पुढील काही दिवस इंधनाच्या दरात घसरण होणार असल्याचं कळतं. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या काही आठवड्यात पेट्रोलने नव्वदी पार केली होती. मुंबईसह अनेक राज्यात पेट्रोलचा दर 90 रुपयांवर पोहोचला होता.

या दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी अडीच रुपयांनी कमी केले होते. त्यात आता आंतरराष्ट्रीय बाजापेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने इंधनाचे दर आणखी कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना तसंच वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचं दिसून येत आहे.