मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतांना दिसत आहे. गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस परिसरातील विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका ठेवलेल्या ठिकाणी आगीची घटना समोर आली. मात्र तात्काळ ही आग विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.


मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नोलॉजी इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका ठेवलेल्या ठिकाणी ही आग लागली होती. यूपीएसला ओव्हर लोड झाल्याने शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली होती. त्यामुळे यूपीएस सिस्टम फेल झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.


विद्यापीठाच्या इमारतीत पुरेशी आग प्रतिबंधक व्यवस्था नसल्याने शेजारच्या इमारतीतून अग्निरोधक यंत्रांच्या साहायाने आग विझवण्यात आली. यामुळे इमारतीत ठेवलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सुरक्षित राहिल्याने मोठा अनर्थ टळला.


आगीच्या चौकशीची मागणी विद्यापीठातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.