मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता प्लास्टिक पिशव्यांच्या (Plastic Bag) वापरावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेकडून यासाठी पाच सदस्यांचे एक पथक देखील तयार करण्यात आले आहे.  हे पथक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणार आहे. त्यामुळे आता जर मुंबईकरांच्या हातामध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्या दिसल्या तर 5 हजार रुपयांचा दंड (Fine) आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत महानगरपालिका फक्त दुकानदारांवर कारवाई करत होती. पण आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणाऱ्या ग्राहकांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. 


नागरिकांचं म्हणणं काय?


महापालिकेकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं आहे. तरीही नागरिकांकडून दंड आकारण्याची गरज नसल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं आहे. तसेच दुकानदारांनीच प्लास्टिकच्या पिशव्या ठेवू नयेत, असं देखील म्हटलं जात आहे. सराकारकडून कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध करुन दिला जात नसल्यानं नागरिक सर्रास प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण नागरिकांनी देखील त्यांची जबाबदारी ओळखायला हवी असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 


दुकानदारांची प्रतिक्रिया काय?


दरम्यान ग्राहक जेव्हा दुकानात भाजी घ्यायला येतात तेव्हा पिशवी आणत नाहीत आणि आमच्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या मागतात. जर आम्ही त्यांना पिशवी नाही दिली तर ते आमच्याकडून सामान घेत नाहीत,' अशी प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली आहे. तसेच महापालिकेकडून दुकानदारांवर देखील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दुकानदारांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्यांची जबाबदारी ओळखायला हवी असं देखील दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.


प्लास्टिकविरोधातील कारवाईला वेग


मुंबईला समुद्र लाभला असल्यामुळे अनेकदा प्लास्टिक कचऱ्यामुळे समुद्रातील पाणी रस्त्यावर आल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच आता महापालिका प्लास्टिकविरोधात कारवाई आणखी कठोर करण्यात आली आहे. 1 जुलै 2022 ते 31 जुलै 2023 या एका वर्षाच्या कालावधीतील आकडेवारीनुसार,  आतापर्यंत 7,91,5000 रुपयांचा दंड दुकानदारांकडून  वसूल करण्यात आला आहे.


तसेच  5283.782 किलो प्लास्टिक आतापर्यंत जप्त करण्यात आलं आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पालिकेचे तीन अधिकारी,  महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा एक अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी असे पाच जणांचे पथक प्रत्येक प्रभागात तैनात करण्यात येणार आहे. 15 ऑगस्टनंतर ही पथके  24 प्रभागांमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या बेजबाबदार वागण्याला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.