नवी दिल्ली : मराठा आरक्षणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात रेंगाळणार नाहीय. येत्या 27 जुलैला या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. तीनच दिवसांत ही सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्याचं सुप्रीम कोर्टात काय होणार या उत्तरासाठी आता फार प्रतीक्षा करावी लागणार नाहीय.
मराठा आरक्षणावरच्या अंतिम सुनावणीची तारीख सुप्रीम कोर्टात निश्चित झालीय. 27 जुलैला सुप्रीम कोर्ट यासंदर्भात अंतिम सुनावणीला सुरुवात करणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ तीन दिवसांत या सुनावणीचा निपटारा कोर्ट करणार आहे. सुप्रीम कोर्टानं तीन दिवसांचाच वेळ या सुनावणीसाठी निश्चित केलाय.
केवळ तीन दिवसांठीच वेळ
केवळ तीन दिवसांठीच वेळ मिळतोय, यावर काही वकिलांनी आपला आक्षेप नोंदवला. हायकोर्टात ही सुनावणी 40 दिवस चालली होती. प्रकरण एका मोठ्या समाज घटकासाठी महत्वाचं आहे असंही सांगायचा प्रयत्न केला. पण कोर्टानं हा युक्तीवाद ऐकला नाही. आम्ही पाच महिने सुनावणी ऐकली म्हणजे न्याय दिला असं होतं का? असा प्रतिप्रश्न कोर्टानं केला. शिवाय विदेशात ब्रेक्झिटसारख्या महत्वाच्या प्रकरणाची सुनावणीही केवळ तासा दीड तासांत संपते असंही सांगितलं.
मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम आदेश नाही, पुढील सुनावणी 27 जुलैला!
दोन्ही बाजूच्या वकिलांना दीड दीड दिवसांचा वेळ
त्यामुळे 27 जुलैनंतर पुढच्या तीन दिवसांतच ही सुनावणी पूर्ण होणार आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांना दीड दीड दिवसांचा वेळ मिळणार आहे. त्या त्या वकीलांनी आपापासात ठरवावं की कुणी कुठल्या क्रमानं युक्तीवाद करायचा आहे, असंही कोर्टानं यावेळी म्हटलं. शिवाय सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावर कुठलाही अंतरिम आदेश दिला नाही. त्यामुळे या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत तरी मराठा आरक्षणाला धोका नाहीय.
मुंबई हायकोर्टाकडून महाराष्ट्र सरकारचा कायदा वैध
मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारचा कायदा वैध ठरवत मराठा आरक्षणाला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. सुप्रीम कोर्टात अनेकदा सुनावणी झाली, पण कोर्टानं कधीच या आरक्षणाला स्थगिती दिली नाही. तीच परंपरा आजही कायम राहिली. जुलै अखेरीस तीन दिवसांत सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्ट निकालाचा दिवस ठरवेल आणि लवकरच या प्रकरणाचं भवितव्य ठरवेल.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या मराठा आरक्षणाला विरोध करत याचिका कोर्टात दाखल आहे. येत्या जुलै अखेरीस ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होतेय. पण आज त्यातही मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला कोर्टानं नकार दिला. 70 ते 75 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण झाली असल्याचं काही वकिलांनी नमूद केलं. मराठा आरक्षणाच्या प्रकरणानं महाराष्ट्राचं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण ढवळून निघालं होतं. या प्रकरणाचा राजकीय दृष्ट्याही परिणाम होणार आहे. त्यामुळेच आता याबाबत सुप्रीम कोर्टात काय निकाल लागतो हे अत्यंत महत्वाचं असणार आहे.
Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रश्नी तूर्तास अंतरिम आदेश नाही, पुढील सुनावणी 27 जुलैला!