ठाणे : ठाणे महानगरपालिकेत दोन जुलैपासून 12 जुलैपर्यंत पहिला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा आठ दिवसांचा अधिकचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र पहिल्या दहा दिवसांमध्ये ठाणे महानगरपालिकेने नेमकी कोणती कामे केली, त्याचा काय परिणाम झाला ते आता पाहुयात!


एकीकडे राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होत असताना ठाण्यात मात्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी पालिकेवर टीका केली. मात्र या लॉकडाऊनमध्ये नियोजित अनेक कामे पूर्ण करण्यात आली असा दावा ठाणे महानगर पालिकेकडून करण्यात येत आहे. यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांची चाचणी करणे, त्यांच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त लोकांना विलगीकरण कक्षात ठेवणे, घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करणे, आरोग्य सेवा सुधारणे अशा मुख्य कामांचा समावेश होता, असे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.


जून महिन्याच्या अखेरीस ठाण्यात रुग्ण संख्या प्रचंड वाढली होती. ठाणे शहरात 1 जुलैला रुग्ण दुपटीचा कालावधी चौदा दिवसांवर येऊन पोहोचला होता. त्यामुळे रुग्ण संख्या वाढीचा दर देखील प्रचंड होता. मात्र हा कालावधी 14 जुलैला 25 दिवसांवर आल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, घरोघरी जाऊन संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधणे हे काम देखील एका रुग्णा मागे 25 व्यक्ती असे वाढवण्यात यश आल्याचे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.


पाहा व्हिडीओ : ठाणे आणि केडीएमसीमध्ये पुुन्हा लॉकडाऊन, उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा



या लॉकडाऊनमध्ये पालिकेने काय काय केले ते पाहूया?


लॉकडाऊनच्या आधी रोज सातशे ते आठशे चाचण्या दर दिवशी केल्या जायच्या. मात्र लॉकडाऊनमध्ये ही संख्या तेराशे चाचण्या प्रतिदिवस इतकी पोचली आहे. ठाणे पालिकेने घरोघरी जाऊन तपासणीच्या संख्येत वाढ केली. यामुळे पालिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकली. 10 दिवसाच्या कालावधीत जवळपास 93 हजारापेक्षा अधिक लोकांच्या घरापर्यंत सर्व्हेच्या माध्यमातून पोचून तपासणी करण्यात आली. लक्षणे असलेल्या लोकांना वेगळे केले गेले.


covid-19ची साखळी तोडण्यासाठी 10 दिवसात 12 हजार पेक्षा जास्त लोकांच्या टेस्टिंग करण्यात आल्या.

दहा दिवसात आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांच्या आदेशानुसार, सहाय्यक आयुक्त हे फिल्डवर काम करून, कोविड रुग्ण किती आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांच्यावर उपचाराने प्रकृतीत बदल झाला का? रुग्ण क्रिटिकल आहे का? यांची माहिती घेत होते. कोविड वॉरियर्स यांची स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली. याचा फायदा असा झाला की, हे वारीयर त्याच विभगतील असल्याने ते स्थानिक नागरिकांवर लक्ष देत होते. घरातून नागरिक बाहेर जातो का? त्याला ताप येतो का? ते कामाशिवाय घराबाहेर पडतात का? ते सुरक्षित अंतर ठेवतात का? याची अचूक माहिती आणि लक्ष ठेवण्यात आले. रुग्णांची कॉन्टेक्ट टेस्टिंग करून जास्तीत जास्त लोकांना शोधून त्यांना कॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल करायचे याकडे लक्ष दिले.


तिकडे ठाणे महानगरपालिकेने केलेल्या कामांचा पाढा वाचला असला तरी मृत्यूदर कमी करण्यात पालिकेला यश आलेले नाही. एक जुलै रोजी ठाण्यातील मृत्युदर हा 2.94 टक्के इतका होता. तोच मृत्युदर वाढून 14 जुलैला तीन टक्के इतका झाला आहे. त्यामुळे आरोग्य सेवेत कुठे ना कुठे कमतरता असल्याचे बोलले जात आहे. मात्र वाढवलेल्या लॉकडाऊनमध्ये अधिक जोमाने काम करून हा मृत्यू दर कमी करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यासाठी सर्वांना चाचणी करण्याची मुभा देखील देण्यात आली आहे.


पाहा व्हिडीओ : ठाण्यात लॉकडाऊन आठ दिवसांनी वाढवला! आता 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन



दहा दिवसांच्या उपाययोजनांमुळे वाढलेला मृत्यूचा दर हा कमी होणार, कारण ठाण्यात मोबाईल डिस्पेनसरी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, वाडिया रुग्णालय अशा ठिकाणी सेंटर आहेत. यापुढे या सेंटरमध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. कोविड चाचणी करण्यासाठी आता कुठल्याही डॉक्टर यांची शिफारसची गरज नाही. कोरोनाच्या अदृश्य लक्षणे जाणवत असल्यास टेस्टिंग करता येणार आहे, त्यामुळे रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल आणि मृत्यूदर कमी होईल असे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.


मात्र पालिका करत असलेल्या उपायोजना या अतिशय तोकड्या असून, रुग्ण संख्या कमी होण्यासाठी आणि आरोग्य सेवा वाढवण्यासाठी अजून कामे करायला हवी असेही स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे. ठाणे मतदाता जागृती अभियानातील संजीव साने यांनी पालिकेवर टीका करताना पालिकेचे सर्व दावे फोल असल्याचे म्हटले आहे. जर इतक्या उपायोजना केल्या जात असतील तर वाढलेल्या रूग्णांसाठी अजूनही बेड का उपलब्ध होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं लॉकडाऊन वाढवत असताना आरोग्य सेवेकडे आणि नागरिकांच्या मागण्यांकडे लक्ष देणे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जात आहे.


मुंबई महानगरपालिकेत आज रुग्ण दुपटीचा कालावधी हा पन्नास दिवसांवर येऊन पोचला आहे. तर ठाणे महानगरपालिकेत अजूनही तो 25 दिवस इतका प्रचंड आहे. मुंबईतील लोकसंख्या देखील ठाण्याच्या कित्येक पट जास्त आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ज्याप्रकारे या साथीच्या रोगांवर आळा घालण्यासाठी विविध पॅटर्न राबवले त्याच प्रमाणे प्रयत्न ठाण्यात देखील व्हायला हवे. केवळ लोक डाऊन वाढवल्याने ते शक्य होणार नाही.


महत्त्वाच्या बातम्या :


कोरोनातून सावरत धारावी पुन्हा नव्या जोमात उभी, मुंबई पोलिसांचं मोठं योगदान


कोरोनामुळे मधुमेही नसलेल्या रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत धोकादायक वाढ