मुंबई : लालबागच्या राजाच्या मुख्य स्टेजसमोर बंदोबस्तावर असलेले भायखळा पोलिस स्टेशनचे पीएसआय सत्यवान पवार यांनी मंडळाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली, असा आरोप लालबागचा राजा गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी केला आहे. तर कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे.
एक महीला पत्रकार मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी स्टेजवर जात होती. त्या महिला पत्रकाराला सत्यवान पवार यांनी रोखले तसेच त्यांच्या एका पोलिस शिपाईच्या नातेवाईकांना चुकीच्या मार्गाने दर्शनासाठी सोडले. त्यावेळी लालबागचा राजा मंडळाचा कार्यकर्ता रोहित श्रीवास्तव याने महीला पत्रकाराला सोडण्यासाठी सांगितले. त्यानंतर पीएसआय सत्यवान पवार याने रोहीत श्रीवास्तवला बेदम मारहाण केली, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
यावेळी मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी सत्यवान पवार यांना मारहाणीचा जाब विचारला असता पीएसआय पवार याने साळवी यांना शिवीगाळ करत धमकी दिली. 'तुमचा उत्सव बंद करून टाकेन...' या मारहाणीत रोहितच्या कानाचा पडदा फाटला.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. रोहितला उपचारांसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या संदर्भात लालबागचा राजा मंडळाचे पदाधीकारी काळाचौकी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेले असता त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना झालेल्या गंभीर मारहाणीसंदर्भात लालबागचा राजा मंडळ आत थेट मुंबई पोलिस आयुक्त आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत.