मुंबई : मुलुंडमध्ये महापालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहन करण्यावरुन वाद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन होणार होतं. मात्र, त्याआधीच सेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला.
प्रकरण काय आहे?
भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन केलं जाणार होतं. तसा नियोजित कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, त्याआधीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारी भाजपचे काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.
हाणामारीच्या घटनेनंतर सोमय्या काय म्हणाले?
"मुंबई महापालिकेतील माफियाचा रावण दहन करण्याचा कार्यक्रम होता. आम्ही माफियाचा पुतळा जाळणार होतो, तर यांच्या पोटात का दुखतंय?" असा सवाल सोमय्या यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. शिवाय, मुंबई महापालिकेला माफियामुक्त करणार असल्याचाही पुनरुच्चार सोमय्यांनी यावेळी केला.
दरम्यान, या हाणामारीच्या प्रकारात भाजपचे काही कार्यकर्ते जखमी झाले असून, सेनेच्या गुंडांनी महिलांवर हात उगारला, असा आरोप सोमय्यांनी केला. हा सर्व प्रकार मुंबई पोलिस आयुक्तांना सांगितला आहे, अशी माहितीही सोमय्यांनी दिली.