वसई : मिरा रोड परिसरात काशिमिरा नाका येथील आणखी 4 बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. तसंच या चारही कॉल सेंटरना सील ठोकलं आहे. नुकताच मीरा-भाईंदरमधील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासही सुरु केला होता. या तपासात नवीन खुलासे समोर येत आहेत.


मीरा रोड भागातील 7 बोगस कॉल सेंटरवर रात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. रॉयल कॉलेज शेजारील डेल्टा बिल्डिंगमधून तब्बल 700 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ठाणे गुन्हे शाखेच्या 200 पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली होती.

काशिमिरा नाका येथील रामदेव प्लाझा येथील तिस-या मजल्यावर चालत असलेल्या कॉलसेंटर मधून 58 कॉम्प्युटर, 61 हार्डडिस्क आणि काही महत्त्वपूर्ण कागदपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत. तर मिरा रोड येथील रसाज सर्कल येथील शांती प्लाझाच्या सेक्टर नंबर 11 मध्येही 21 कॉम्प्युटर, 18 हार्डडिस्क, तर मिरा रोड मधील स्पेस रिअलिटी- 912 मधील 405 आणि 406 मध्येही 39 कॉम्प्युटर आणि 39 हार्डडिस्क पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

याव्यतिरिक्त बिल्डींग नंबर 6 मध्येही 16 कॉम्प्युटर, हार्डडिस्क आणि महत्त्वपूर्ण कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली आहेत. ठाणे पोलिसांनी चारही कॉलसेंटर्सच्या दरवाजाला सील ठोकलं आहे.