मुंबई : जिल्ह्यातील एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. या हल्ल्यात भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. जालन्यात प्रेमीयुगलांना टारगट मुलांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. या निमित्ताने अशा विकृतींचं करायचं काय असा प्रश्न उपस्थित झालाय. या विषयावर माझा विशेष कार्यक्रमात चर्चा केली गेली. या चर्चेत सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम, भाजप आमदार देवयानी फरांदे, मराठी अभिनेत्री आदिती सारंगधार, या चर्चेत मान्यवरांनी अशा विकृतांना घरातच पायबंद घातला पाहिजे, अशी भावना प्रत्येकाने व्यक्त केली. सोबतच अशा विकृतांना कायद्याच धाक असल्याची गरज असल्याचाही सूर देखील या चर्चेतून निघाला.
त्या नराधमांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही - प्रा. ज्योती वाघमारे
चर्चेच्या सुरुवातीलाच या घटनेचा निषेध नाही तर धिक्कार करायचा आहे. अशा नराधमांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया प्रा. ज्योती वाघमारे यांनी दिली. त्या म्हणाल्या, मुलींना गर्भात मारण्याची भीती, लग्न झाल्यानंतर जाळली जाण्याची भीती, बाहेर पडली तरी कुणी हल्ला करेल म्हणून भीती. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे का? आज स्त्रीला व्यक्ती नाही तर वस्तू असल्यासारखं तिच्याकडं पाहिल जातं असल्यानेच अशा गोष्टी घडत असल्याचं मत वाघमारे यांनी व्यक्त केलं.


पीडीतेचं आर्थिक पुनर्वसन करणं सोपं आहे. मात्र, तिला बसलेल्या मानसिक धक्क्याचं काय? केवळ फंड निर्माण करुन त्याचा काहीही फायदा नाही. खेळाडूंप्रमाणे सरकार नोकऱ्यांमध्ये पीडित महिलांना काही जागा राखीव ठेवण्याची मागणी यावेळी प्राध्यापक वाघमारे यांनी केली. निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्यास विलंब होत असल्यानेच अशा विकृत लोकांची हिम्मत वाढत चालल्याचेही त्यांनी बोलून दाखवलं. सोबतच मुलींना स्वसंरक्षण देण्याची गरज असल्याच्याही त्या म्हणाल्या.

पोलीसांमध्ये काही प्रमाणात असंवेदनशीलता - यशोमती ठाकूर
ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत या गुन्ह्यातील दोषीला फाशीच द्यायला हवी, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असल्याचंही त्यांनी सांगितले. हैदराबाद, जालना आणि आता वर्ध्यातील आजची घटना वाईट असल्याच्या त्या म्हणाल्या. सोबतच पोलीसांमध्ये काही प्रमाणात असंवेदनशीलता दिसून येते असल्याचेही त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रात कायदा आणि सुवव्यवस्थेचा प्रश्न गंभीर - आमदार देवयानी फरांदे
या घटनेमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचं समोर आल्याचं मत भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलं. यातील दोषींना कडक शासन करायलं हवं. राज्य सरकारने पीडितांच्या पुनर्वसनासाठी केलेला फंड तोकडा असून अशा पद्धतीच्या घटना घडूच नये आणि घडल्या तर दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी फरांदे यांनी केली. तर, मुलींनीही अशा घटना घडल्यानंतर गप्प न बसता याची माहिती शिक्षक, पालक किंवा मित्रमैत्रीणींना देण्याची गरज असल्याच्याही त्या म्हणाल्या.

समाज म्हणून आपलीही जबाबदारी - उज्वल निकम
अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करण्याची गरज ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, लोकं म्हणतात खटला जलदगती न्यायालयात चालवा. मात्र, सध्या फास्ट ट्रॅक कोर्ट तुडूंब भरलेत. त्यामुळे तिथंही पीडितेला लवकर न्याय मिळण्याची शक्यता कमी झालीय. स्त्रीवर मालकी हक्क सांगणाऱ्या विकृतांना कायद्याची जरब बसायला हवी. या संदर्भात समाजाची देखील जबाबदारी आहे. घटनेवेळी समाज बघत बसतो. त्याचाही आपण विचार करायला हवा. वय लहान म्हणून जो बचाव केला जातो. त्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. ही घटना पाहाता, हे कृत्य सुनियोजित असल्याचे मत उज्वल निकम यांनी मांडले. सध्या आई-वडीलांचे आपल्या मुलांकडे लक्ष नाहीय. ते टिव्हीवरील मालिकांमध्ये व्यस्त असतात. परिणामी मुलं वाममार्गाला जाण्याची शक्यताही त्यांनी सांगितली. त्यामुळे कायद्याने हा प्रश्न सुटणार नसून समाज म्हणून आपलीही जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

कायद्याची भीती गुन्हेगारांना वाटलीच पाहिजे. याची जबाबदारी न्यायव्यवस्था आणि सरकारवर आहे. त्यासाठी कायद्यात बदल करायलाच हवे. त्यासाठी न्यायव्यवस्था जलद करणे गरजेचे आहे. त्याचवेळी अशा गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती बसेल. सुडाच्या भावनेतून त्याने तिला संपवण्याचा प्रयत्न केलाय. यावरुन हा कट सुनियोजित कट वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच स्त्रीयांच्या तक्रारी घेण्याकरीता महिला पोलीस अधिकारी असायला हव्यात. या तक्रारीवेळी त्याचं छायाचित्रण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जेणेकरुन स्त्रीयांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.

ही विकृती घरीच ठेचायला हवी - आदिती सारंगधार
ही घटना वाचल्यानंतर खूप दुःख झाले. वारंवार या घटनांची संख्या वाढत आहेत. कठोर कायदे असूनही या घटना कमी होत नाहीय. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी आता मार्ग बदलण्याची गरज असल्याचे मत मराठी अभिनेत्री आदिती सारंगधार हिने व्यक्त केलं. ही विकृती घरीच ठेचायला हवी. घरापासूनच नाही ऐकण्याची सवय मुलांना लावायला हवी. त्यासाठी मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे असल्याचे ती म्हणाली. अशा घटनांमध्ये सर्वात महत्वाची भूमिका पोलीसांची असते. पोलीसांचा धाक समाजात असायला पाहिजे. अशा घटनांमध्ये महिलांसोबत पोलीसांनी संवेदनशीलतेने वागायला हवे. मात्र, या घटना घडूच नये असं वाटत असेल तर निकोप समाज निर्माण करण्यासाठी घरातच मुलांवर संस्कार करायला हवेत.

संबंधित बातमी धक्कादायक! वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Girl Burnt Alive | एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न | वर्धा