मुंबई : तुम्ही स्विगी, झोमॅटो, फुडपांडा यांसारख्या वेबसाईट्सवरून जर खाद्यपदार्थ ऑर्डर करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण या कंपन्या अस्वच्छ ठिकाणांहून ग्राहकांना खाद्यपदार्थ पुरवत असल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पाहणीत निदर्शनास आलंय. त्यामुळे स्विगी, झोमॅटो, फुडपांडा, उबर-इट्स यांना अन्न व औषध प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. तसंच ज्या हॉटेल्समधून हे खाद्यपदार्थ दिलं जातं, अशा मुंबईतल्या 113 आस्थापनांकडे परवाना नसल्याचंही एफडीआयच्या पाहणीत उघड झालंय. ई-कॉमर्स आणि ऑनलाईन खरेदी विक्रीच्या क्षेत्रात अन्नपदार्थही ऑनलाईन पद्धतीने मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या ऑनलाईन अॅप आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून अन्नपदार्थ पुरवण्याऱ्या कंपन्यांच्या आस्थापना विनापरवाना आणि अस्वच्छ ठिकामी सुरु असल्याची बाब अन्न व औषध प्रशासनाच्या पाहणीतून समोर आली आहे. या मोहिमेत 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीच एकूण 347 आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात 113 आस्थापना अन्न सुरक्षा माणदे कायद्यांअंतर्गत परवाना आणि नोंदणी नसताना सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबरइट अशा ऑनलाईन अॅपद्वारे आणि साईटद्वारे ग्राहकांना अन्नपदार्थ पुरवण्याऱ्या कंपन्यांचाशी संबंधित आस्थापनांचा समावेश आहे. यात 85 आस्थापना या स्विगी, 50 आस्थापना झोमॅटो, 3 आस्थापना फुडपांडा आणि 2 आस्थापना या उबरइट या ऑनलाईन अॅपशी संलग्न आहेत. त्यामुळे अशा आस्थापनांवर अन्न सुरक्षा माणदे कायदा अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली असून त्यांच्या उत्तरानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाचे दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासोबत ही कारवाई केली.