मुंबई : अन्न आणि औषध विभागातील कथित लाचखोरीचे प्रकरण गाजत असतानाच विभागातील इतर गैरव्यवहारही आता उघडकीस येत आहेत. सामान्य जनतेच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या विभागात ढिसाळ कारवाई होत असल्याचा आरोप करत एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Continues below advertisement

अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप 

सूरज केराप्पा पडवळकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, विभागातील भ्रष्ट वर्तुळाच्या केंद्रस्थानी उल्हास इंगोले नावाचा अधिकारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात या आधी विधान परिषदेत आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारीने आरोप केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनीही इंगोलेंच्या संपत्तीची आणि कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, सभागृहात विभागीय चौकशीचे आश्वासन देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.

चौकशी अहवाल प्रलंबित का?

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, दक्षता सहआयुक्तांकडून संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली होती. तरीही, त्या चौकशीचा अहवाल अद्याप सादर का झालेला नाही, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Continues below advertisement

याशिवाय, संबंधित अधिकाऱ्याने मुख्यालय सहआयुक्त (अन्न) हा अतिरिक्त कार्यभार अनेक वर्षे स्वतःकडेच बेकायदेशीररीत्या ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दीर्घकाळ बदली न होता एकाच पदावर राहण्यामागील कारणांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पोलिसांना नमुने तपासणीस अडथळा?

महाराष्ट्र पोलिसांना नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकारात दिला, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा 

या सर्व प्रकरणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून विभागातील एकूण व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार सूरज केराप्पा पडवळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे विभागाची कार्यक्षमता बाधित होत असून, योग्य कारवाई झाल्यास विभाग प्रभावीपणे काम करू शकेल, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

ही बातमी वाचा: