मुंबई : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात, त्यात राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची पोटनिवडणूक म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार एकाच वेळी घराची आणि पक्षाची जबाबदारी यशस्वरित्या सांभाळताना दिसत आहेत. आजारी वडिलांसोबत राहून त्या पंढरपुरातील प्रचारसभेत व्हर्चुअल सहभागी झाल्या. ब्रीच कॅण्डी रुग्णालयाच्या गेटवर उभं राहून त्यांनी भाषण केलं आणि पंढरपुरातील सभा गाजवली.


आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर इथे निवडणूक लागली. 17 एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रचाराचे शेवटचे काही दिवस आहेत. भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत.


राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनी या आधी पंढरपूर आणि मंगळवेढ्यात जाऊन सभा घेतल्या तर दुसरीकडून देवेंद्र फडणवीस प्रचार सभा घेत आहेत. अशा वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मात्र शरद पवार रुग्णालयात दाखल असल्याने मुंबईतच आहे. त्या पंढरपूरला जाऊ शकत नसल्याने मुंबईतून त्यांनी प्रचार सभेला उद्देशून भाषण केले.




मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयाच्या गेट वर उभं राहून सुप्रिया सुळे यांनी थेट पंढरपुरातील सभेसाठी भाषण केले. मुंबईत त्यांनी केलेले भाषण लाईव्ह टेलिकास्ट पंढरपुरात दाखवण्यात आले. कोरोना काळात सभा घेण्यावर एकीकडे बंधन आहेत. त्यात वडिलांवर शस्त्रक्रिया झाल्याने सुप्रिया सुळे मुंबईतच थांबून आहेत. अशावेळी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी भाषण केले आणि प्रचारात सहभागी झाल्या.


पहिल्यांदाच निवडणुकीत असे चित्र दिसत आहे की नेत्यांना प्रचार करताना गर्दी होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. अशा वेळी टेक्नॉलॉजी माध्यमातून सभा घेण्याची वेळ आली आहे.


घरची जबाबदारी आणि पक्षातील जबाबदारी या दोन्ही एकाच वेळी खासदार सुप्रिया सुळे सांभाळताना दिसत आहेत. वडील आजारी असले तरी त्यांच्याबरोबर राहून निवडणुकीतही मतदारांना आणि कार्यकर्त्यांना मतदानासाठी आवाहन त्यांनी केलं. सुप्रिया सुळे यांनी अशा दोन सभांना संबोधित केलं.