Father And Son Suicide Bhayandar Station: पश्चिम मार्गावरील भाईंदर स्थानकाजवळ हरिश मेहता (Harish Mehta) आणि जय मेहता (Jay Mehta) या पितापुत्रांनी लोकल खाली (Mumbai Local Train) येऊन आत्महत्या केली होती. 8 जून रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास चौथ्या क्रमांकाच्या जलद मार्ग रेल्वे रुळावर विरारवरुन चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलखाली पितापुत्राने स्वत:ला झोकून दिले.  या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांना वेदना झाल्या. तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक कारण सांगितलं जात होतं. मात्र याबाबत आता धक्कादायक महिती समोर आली आहे. 


पोलिसांनी जय आणि हरीश यांच्या मोबाइलची तपासणी चालवली असून, त्यात हरीश हे शेअर मार्केटचे काम करीत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, आत्महत्येबाबतचे ठोस कारण त्यातून निदर्शनास आलेले नाही. कर्ज वा कौटुंबिक वाद असल्याचे अजून तरी समोर आलेले नसून जय मेहता यांच्या पत्नीनेही कर्ज नसल्याचे सांगितले आहे. मेहता पिता-पुत्राच्या मोबाइलची तपासणी सुरू आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 


नेमकं काय घडलेलं?


हरिश आणि जय मेहता हे दोघेही भाईंदर स्थानकातून रेल्वे ट्रॅकपर्यंत चालत जातानाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये बापलेक फलाटावरून चालत जात रेल्वे रुळांवर उतरल्याचे दिसत आहे. रेल्वे ट्रॅकवर उतरल्यानंतर हे दोघेही नायगावच्या दिशेने चालू लागले. त्यावेळी या दोघांना फास्ट ट्रॅकवरुन चर्चगेटला जाणारी ट्रेन येताना दिसली. या ट्रेनच्या मोटरमनला अंदाज येऊ नये, यासाठी वडील आणि मुलगा दोघेही सुरुवातीला शेजारच्या ट्रॅकवरुन चालत राहिले. मात्र, चर्चगेट लोकल अगदी जवळ आल्यानंतर बापलेक अगदी मनाशी निर्धार केल्याप्रमाणे एकमेकांचा हात धरुन ट्रेनसमोर गेले आणि ट्रॅकवर झोपले. या दोघांनाही रेल्वे ट्रॅकवर झोपताना आपापलं डोकं रुळांवर ठेवलं होतं. त्यामुळे लोकल ट्रेन अंगावरुन गेल्यानंतर या दोघांच्या डोक्याचा भाग छिन्नविछिन्न झाला होता.






लोको पायलला रेल्वे अचानक थांबवणे शक्य झाले नाही-


पिता-पुत्र अचानक लोकल ट्रेनसमोर दोन जण येताना पाहून ट्रेनच्या ड्रायव्हरने लोकल ट्रेन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ट्रेन थांबली तोपर्यंत दोघेही ट्रेनखाली आले. आत्महत्या केलेले दोघेही बाप-लेक असून ते नालासोपारा येथील रहिवासी होते. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एडीआरशिवाय गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


संबंधित बातमी:


बापलेक एकमेकांशी बोलत प्लॅटफॉर्मवरून रेल्वे ट्रॅकवर उतरले अन् घट्ट मिठी मारत स्वतःला लोकल ट्रेनसमोर झोकून दिलं