मुंबई: पश्चिम रेल्वेमार्गावरील भाईंदर स्थानकात लोकल ट्रेनसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या करणाऱ्या हरिश मेहता आणि जय मेहता या पितापुत्रांची सध्या चांगलीच चर्चा आहे. हरिश मेहता (Harish Mehta) आणि जय मेहता या बापलेकाच्या आत्महत्येवेळचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या मनाला वेदना झाल्या होत्या. दोघेही बापलेक एकमेकांचा हात पकडून मृत्यूला सामोरे गेले होते. या दोघांनी रेल्वे ट्रॅकवर डोकं ठेवलं, त्यामुळे ट्रेन (Mumbai Local Train) यांच्या डोक्यावरुन जाऊन त्याचा चेंदामेंदा झाला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हरिश आणि जय मेहता (Jay Mehta) यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याची चर्चा सुरु झाली होती. या दोघांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.
हरिश मेहता आणि जय मेहता हे दोघे वसईतील वसंतनगरी परिसरात राहत होते. मंगळवारी त्यांच्या नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी हरिश आणि जय मेहता यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा पोलिसांना घरात इंग्रजी भाषेत लिहलेली एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत या प्रकरणास आम्ही जबाबदार आहोत, असे लिहलेले आहे. त्यामुळे मेहता पितापुत्रांनी आत्महत्या केली की काही वेगळाच प्रकार आहे, या शक्यतेने पोलीस तपास करत आहेत. पोलिसांकडून सध्या मेहता बापलेकाच्या बँक खात्याचा तपशील, ईमेल आणि मोबाईल रेकॉर्ड तपासले जात आहेत.
सुरुवातीला मेहता पितापुत्रांना शेअर बाजारात प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने ते कर्जबाजारी झाल्याचे सांगितले जातो होते. मात्र, पोलिसांनी नव्याने केलेल्या तपासात हरिश मेहता आणि जय मेहता यांनी कोणतेही कर्ज घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. मग मेहता पितापुत्रांनी नेमक्या कोणत्या दबावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असा सवाल आता निर्माण झाला आहे. त्यामुळे या एकूण प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
भाईंदर स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये अंगावर काटा आणणारा प्रसंग कैद
हरिश आणि जय मेहता हे दोघेही भाईंदर स्थानकातून रेल्वे ट्रॅकपर्यंत चालत जातानाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये बापलेक फलाटावरून चालत जात रेल्वे रुळांवर उतरल्याचे दिसत आहे. रेल्वे ट्रॅकवर उतरल्यानंतर हे दोघेही नायगावच्या दिशेने चालू लागले. त्यावेळी या दोघांना फास्ट ट्रॅकवरुन चर्चगेटला जाणारी ट्रेन येताना दिसली. या ट्रेनच्या मोटरमनला अंदाज येऊ नये, यासाठी वडील आणि मुलगा दोघेही सुरुवातीला शेजारच्या ट्रॅकवरुन चालत राहिले. मात्र, चर्चगेट लोकल अगदी जवळ आल्यानंतर बापलेक अगदी मनाशी निर्धार केल्याप्रमाणे एकमेकांचा हात धरुन ट्रेनसमोर गेले आणि ट्रॅकवर झोपले. या दोघांनाही रेल्वे ट्रॅकवर झोपताना आपापलं डोकं रुळांवर ठेवलं होतं. त्यामुळे लोकल ट्रेन अंगावरुन गेल्यानंतर या दोघांच्या डोक्याचा भाग छिन्नविछिन्न झाला होता.
आणखी वाचा