भिवंडी : जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात ठेवत महिला सरपंचासह पतीवर तलवारीने जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भिवंडी तालुक्यातील वडपा स्मशानभूमी परिसरात मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने या भ्याड हल्ल्यात सरपंच महिला किरकोळ जखमी झाली असली तरी पती गंभीर जखमी झाला आहे. या दोघांवरही शहरातील अल राजी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली खांडपे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच निलम पाटील या आपले पती महेश पाटील यांच्यासोबत कामानिमित्त त्यांच्या चारचाकी कारने ठाणे येथे जात होत्या. गावच्या रस्त्याचे काम सुरु असल्याने महेश पाटील यांनी आपली गाडी वडपा गोदामातील पर्यायी रस्त्यावरून टाकली. त्यावेळी या रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमी जवळ त्यांच्या पाळतीवर असलेल्या तीन कारमधील इसमांनी त्यांची गाडी अडवून गाडीवर हल्ला केला.
ठाण्यातील जमील शेख हत्या प्रकरणी शूटरला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, सूत्रधाराची उकल होणार?
सरपंचांच्या गाडीच्या काचा फोडून महिला सरपंच निलम पाटील यांना गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सरपंचाचे पती महेश पाटील यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी महेश पाटील यांच्यावर तलवार व इतर हत्यारांनी भ्याड हल्ला केला. या हल्यात महेश पाटील व त्यांच्या पत्नी देखील गंभीर जखमी झाले असून या दोघांवरही चावींद्रा रोडवरील अल राजी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Mumbai Crime News | Ludo मध्ये वारंवार पराभूत होत असल्यामुळं मित्राकडूनच मित्राची हत्या
दरम्यान हा हल्ला ग्रुप ग्राम पंचायत चिंचवली खांडपे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व त्यांच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती जखमी महिला सरपंच निलम पाटील यांनी दिली. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अजित पाटील, नितेश पाटील, उमेश पाटील, शशी पाटील आणि त्यांच्या इतर 3 ते 4 साथीदारांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.