मुंबई : प्रकाश मेहता आणि राधेश्यम मोपलवार यांच्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरलं असतानाच, आता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीही सरकारला धारेवर धरलं.

"एमआयडीसीच्या प्रकल्पांबाबत मी माहिती मागत आहे. दोन अधिवेशनं उलटून गेली तरी मला माहिती का दिली जात नाही," असा सवाल एकनाथ खडसेंनी विधानसभेत सरकारला विचारला.

घोटाळा असल्यानेच माहिती लपवली जात असल्याचा सनसनाटी आरोपही एकनाथ खडसेंनी सरकारवर केला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही खडसेंना दुजोरा दिला आहे.

एकनाथ खडसे काय म्हणाले?
"राज्यभरातील जमीन संपादित करण्यासाठी सरकारने नोटिफिकेशन काढलं. हजारो एकर जमिनी शेतकऱ्यांच्या घेतल्या. परंतु त्या मोकळ्या केल्या. अशी मोकळे केलेले किती भूखंड आहेत हे मी सभागृहात विचारतोय. पण ते देऊ शकत नाहीत. मला ही माहिती सभागृहात सहा सहा महिने मिळत नाही. मला विनंती आहे की, आपल्या माध्यमातून ही माहिती मला पुढच्या आठवड्यात मंगळवार-बुधवारी मिळेल का? नाहीतर हे पण अधिवेशन गेलं. एक एक वर्ष भांडून भांडून मिळत नसेल तर माहिती शासन का दडवतंय? काय लपवतंय? काय असं आहे की ते मला माहिती देऊ शकत नाहीत? त्या प्रकरणात फार मोठी अफरातफर झाल्याची शंका असल्यामुळे ही माहिती सभागृहात येत नाही, असा माझा आरोप आहे."