मुंबई : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक '20 ब'मधील भाजप उमेदवार नयना वसाणी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तब्बल 12 तासांनंतर रात्री एक वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्यांचा अर्ज बाद ठरवला.
मीरा-भाईंदर महापालिकेसाठी 2 ऑगस्टला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर 3 ऑगस्टला अर्जाची छाननी प्रक्रिया होती. त्याचवेळी प्रभाक क्रमांक 20 ब मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सीमा जैन यांनी आपली प्रतिस्पर्धी नयना वसाणी यांच्या शपथपत्राबाबत दुपारी 1 वाजता हरकत नोंदवली होती.
नयना वसाणी यांनी आपल्या शपथपत्रात त्यांच्यावर नोंद असलेल्या एका गुन्ह्याची माहिती नमूद न केल्याचं सीमा जैन यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निदर्शनास देत, वसाणी यांच्या उमेदवारीबाबत हरकत घेतली होती. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांनी याबाबत दोघांच्या बाजू ऐकूण घेण्यासाठी सायंकाळ पाचची वेळ दिली.
दोन्ही बाजूच्या वकिलांनी सुमारे पाऊण तास चर्चा केली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखलेही देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांनी आपला निर्णय सुनावण्यासाठी रात्रीचा एक वाजवला. अर्चना कदम यांनी रात्री एक वाजता भाजपाच्या उमेदवार नयना वसाणी यांचा अर्ज बाद ठरवला.
सीमा जैन या भाजपाच्या नगरसेविका होत्या, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला सभागृहात मदत केली होती. त्यामुळे खवळलेल्या भाजपाने जैन यांच्या कार्यालयाची मोडतोड केली होती. त्यात नयना वसाणी यांचं नावही होतं. तोच गुन्हा वसाणी यांनी आपल्या शपथपत्रात नोंद केला नव्हता.
दरम्यान, भाजपाला या निवडणूकीत दुसरा धक्का बसला आहे. छाननीत काँग्रेसच्या उमेदवार उमा सपार या प्रभाग 22 अ मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत.
रात्री 1 वाजता भाजप उमेदवाराचा अर्ज बाद, 12 तासांनी निकाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Aug 2017 11:53 AM (IST)
निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांनी आपला निर्णय सुनावण्यासाठी रात्रीचा एक वाजवला. अर्चना कदम यांनी रात्री एक वाजता भाजपाच्या उमेदवार नयना वसाणी यांचा अर्ज बाद ठरवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -