Jaipur Express Firing : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार  (Jaipur-Mumbai Central Express) करणारा आरपीएफचा आरोपी जवान चेतन सिंह (Chetan Singh) या मानसिक रुग्ण असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, आज रेल्वे मंत्रालयाने त्याच्या मानसिक आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आरपीएफ जवानांच्या आरोग्य तपासणीत चेतन सिंह याला कोणताही मानसिक आजार झाला नसल्याचे आढळले असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले.  


गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी चेतन सिंह हा "abnormal hallucinations" या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे काही वृत्तसंस्थांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले होते. रेल्वे मंत्रालयाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांची नियतकालिक वैद्यकीय तपासणी (PME) प्रणाली आहे आणि मागील पीएमईमध्ये चेतन सिंह याची अशी कोणतीही वैद्यकीय आजार/स्थिती आढळून आली नाही. सध्याच्या वैद्यकीय आजारावर उपचार चेतन सिंग याने त्याच्या वैयक्तिक पातळीवर घेतले असू शकतात. मात्र, आरपीएफच्या वैद्यकीय नोंदीवर नाही. ही बाब चेतन सिंह आणि त्याच्या कुटुंबीयांनी लपवून ठेवली असू शकते, असेही रेल्वे मंत्रालयाने म्हटले. सध्या जयपूर एक्स्प्रेसमध्ये झालेल्या हत्याकांडाचा तपास बोरिवली जीआरपीकडून सुरू आहे. 


आरोपी चेतन सिंहला 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी


दरम्यान, जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये काल झालेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी चेतन सिंहला बोरिवली कोर्टाने 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी जीआरपी पोलिसांनी आतापर्यंत 10 ते 15 प्रवाशांचे जबाब नोंदवले आहेत. शिवाय जीआरपी आरोपी चेतन सिंहचे कॉल रेकॉर्ड देखील तपासणार आहेत.  


चेतन सिंह गोळीबार करून पळ काढण्याचा प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आलं. चेतन सिंहला या प्रकरणात मंगळवारी बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आलं. एक्स्प्रेसमधील काही कोचमधलं सीसीटीव्ही फुटेजही हाती लागलं असून त्याच्या निरीक्षणाचंही काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


चेतन सिंह हा मूळचा उत्तर प्रदेशमधील हाथरसचा आहे. यापूर्वी त्याची पोस्टिंग गुजरातमध्ये होती.  नुकतीच त्याची मुंबईत नियुक्ती झाली होती. तो मुंबई सेंट्रल आरपीएफमध्ये तैनात आहे. त्याचं पोलीस ठाणं हे लोअर परळ आहे. रविवारी रात्री दुसऱ्या एका ट्रेनमध्ये ड्यूटीवर होता. त्या ट्रेनमधून तोे सुरतला उतरला. त्यानंतर त्यानं काही वेळ त्यानं आराम केला, आणि मग पहाटे 2 वाजून 50 मिनिटांनी ड्यूटीचा भाग म्हणून तो जयपूर एक्स्प्रेसमध्ये चढला. त्याच्यासोबत आणखी दोन हवालदार आणि त्यांचे वरिष्ठ टीकाराम मीणा देखील होते. त्यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्याने मीणा यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने काही प्रवाशांनादेखील गोळ्या झाडून ठार केले. एका प्रवाशाची हत्या केल्यानंतर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 


इतर महत्त्वाचा बातम्या: