मुंबई : दिवाळीनिमित्त रेशन दुकानावरील धान्यावर अवलंबून असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळी गोड करण्यासाठी रेशनकार्डवर नेहमीच्या कोट्यापेक्षा एक किलो साखर, एकूण 2 किलो डाळ अधिक मिळणार आहे. एवढंच नाही तर आरोग्यासाठी आवश्यक असलेले आयोडिनयुक्त मीठही मिळणार आहे.
रेशन दुकानावर साखर बाजार भावापेक्षा काहीशी स्वस्त म्हणजे 20 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होणार आहे. तर डाळ नेहमीच्याच दरात म्हणजे 35 रुपये प्रति किलो दराने दिली जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
रेशन दुकानावर डाळींमध्ये तूरडाळ, चणाडाळ आणि उडीद डाळ घेण्याचा पर्याय रेशनकार्ड धारकांना ठेवण्यात आला आहे. याशिवाय सणासुदीच्या काळात खव्यामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी विविध ठिकाणी भरारी पथक नेमले जात तपासणी केली जाणार असल्याचं गिरीश बापट यांनी सांगितलं.