वसई : राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई-विरारचे शहर जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात 5 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई तालुक्यातील राजकीय नेते असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर विविध पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
तुळींज, नालासोपारा, आणि विरार पोलीस ठाण्यात एकाच रात्रीत 4 खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी उपजिल्हाप्रमुख धनंजय गावडे, भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अरुण सिंग यांच्यासह अन्य सहा जणांवर विरार आणि तुळींज पोलीस ठाण्यात पिस्तुल दाखवून खंडणी मांगितल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.
बांधकामावर माहिती अधिकार टाकून, त्याची तक्रार न करण्यासाठी हे राजकीय पुढारी लाखो रुपयांची खंडणी मांगत असल्याचा आरोप आहे. नालासोपारा पोलिसांनी राष्ट्रवादीचे गुंजाळकर यांना, तर शिवसेनेचे नितीन पाटील, कल्पेश राठोड यांना तुळींज पोलिसांनी अटक केली. शिवसेनेचे धनंजय गावडे, रमेश मोरे, भाजपचे अरुण सिंग आणि त्याचे साथीदार फरार आहेत.