मुंबई : अँटीलियाच्या बाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्याप्रकरणी आज एनआयए कोर्टात दहा हजार पानांची चार्जशीट केली सादर केली. ज्यामध्ये सचिन वाझेने अँटीलिया बाहेर स्फोटकांची गाडी का ठेवली? याचं कारण देण्यात आलं आहे. ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात सचिन वाझेला सस्पेंड करण्यात आलं. मात्र, 2020 मध्ये वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं आणि इतकंच नाही तर क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट (सीआययु) सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर त्याला बसवण्यात आलं.


सचिन वाझेची ओळख ही उत्तम तपास अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून होती. मात्र, पंधरा वर्षानंतर मुंबई पोलिस दलात रुजू झाल्यावर त्याला ती ओळख पुन्हा मिळवायची होती आणि म्हणून त्याने अँटीलियाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्याचा हा सगळा कट रचल्याचा एनआयएने आपल्या आरोप पत्रात म्हटलं आहे.


24 फेब्रुवारीच्या रात्री अँटीलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात आली, ही स्कॉर्पिओ सचिन वाझेचा मित्र मनसुख हिरण यांचीच होती. सचिन वाझे यानी मनसुख हिरणला गाडी हरवल्याची तक्रार नोंदवण्यास सांगितलं. मात्र, ती स्कॉर्पिओ गाडी सचिन वाझेकडेच होती. इतकंच नाही तर या प्रकरणाचं गांभीर्य वाढवण्यासाठी ही गाडी दहशतवादी संघटन "जैश उल हिंद" कडून ठेवण्यात आल्याचा बनावसुद्धा सचिन वाझेने केला. सगळ्यात आधी गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये स्फोटकांची गाडी ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो नंतर क्राईम इंटेलिजन्स युनिटकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आणि या गुन्ह्याचा तपास अधिकारी सचिन वाझे झाला.


सचिन वाझेसह रियाझ काझीला जामीन नाकारला, एनआयएला याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास आणखीन 30 दिवसांची मुदतवाढ


प्रकरण इतकं चिघळेल याची पूर्व।कल्पना सचिन वाझेने केली नव्हती आणि जेव्हा हे प्रकरण हाताबाहेर जाताना सचिन वाझेला दिसलं तेव्हा त्याने मनसुख हिरणला सर्व आरोप स्वतःवर घेण्यास दबाव आणला. मात्र, मनसुखने जेव्हा हे आरोप स्वतःवर घेण्यास नकार दिला तेव्हा सचिन वाझेने मनसुख हिरणची हत्या करण्याचा प्लॅन आखला. या प्लॅनमध्ये त्याने सुनील माने आणि प्रदीप शर्माला आपल्या सोबत घेतले आणि यांच्यासोबत मिळून त्यांनी मनसुखच्या हत्येचा कट रचला.


प्रकरण शांत होईपर्यंत मनसुख हिरणला अंडरग्राउंड होण्याचा सल्ला सचिन वाझेने दिला. मात्र, या मागचा मुख्य उद्देश मनसुख हिरणची हत्या करणं होता. सुनील माने याने मनसुख हिरणला आपल्या गाडीत बसवलं आणि नंतर मनसुख हिरणला इतर आरोपी संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोटखुरी, मनीष सोनी यांच्या हवाली केलं, ज्यांनी नंतर मनसुख यांची हत्या केली आणि ठाण्यातील रेतीबंदर खाडीमध्ये त्यांचा मृतदेह टाकून दिलं जे नंतर सापडले.


हा गुन्हा करण्यासाठी आरोपीने नवीन मोबाईल फोन, सिम कार्ड वापरले होते जे विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांनी पुरवले होते. सचिन वाझेने त्याचा सहकारी रियाजुद्दीन काजीलासुद्धा सोबत घेतलं आणि तपासात जे पुरावे हाती लागले ते सर्व नष्ट करण्यास त्याला सांगितलं.