मुंबई : मनसुख हिरण हत्येच्या दिवशी सचिन वाझे  यांचं रात्रीचं Exclusive सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. या फुटेजमध्ये सचिन वाझे 4 मार्चला रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी डोंगरी पोलीस स्टेशनला पोहचल्याचं दिसतंय. एनआयए सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, सचिन वाझे जाणिवपूर्वक या पोलीस स्टेशनला आले होते, कारण चौकशी झाली तर हा व्हिडीओ आपल्या बाजूने पुरावा म्हणून त्यांना वापरता आला असता. हाच व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. 


एनआयएने दिलेल्या माहीतीनुसार, सचिन वाझे हे 4 मार्च रोजी मनसुख हिरण यांच्या हत्येच्या कटात सहभागी होते. त्यांच्या सांगण्यावरूनच आरोपी विनायक शिंदेने मनसुख हिरण यांचा खून केला होता. त्या रात्री सचिन वाझे यांच्या सांगण्यावरूनच मनसुख हिरण यांना आरोपी विनायक शिंदे तावडे या नावाने फोन केला आणि ठाण्यातील घोडबंदर रोडवर भेटायला बोलावलं होतं. एटीएसकडून करण्यात आलेल्या चौकशीत विनायक शिंदेनेही कबुली दिली आहे.


मनसुख हिरण जेव्हा विनायक शिंदेला भेटायला आला तेव्हा विनायक शिंदेने मनसुख हिरण यांना गाडीत बसण्यास सांगितलं. त्यानंतर गाडीतच मनसुख हिरण यांना बेशुद्ध करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, त्या गाडीमध्ये सचिन वाझे देखील होते. मनसुख यांच्या तोंडात रुमाल कोंबले त्यांना बेशुद्ध केल्यानंतर सचिव वाझे यांनी विनायक शिंदेला मनसुख यांना खाडीत फेकून देण्यास सांगितलं. त्यानंतर सचिन वाझे स्वतः 10 वाजून 30 मिनिटांनी ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि फ्रीवे वरुन मुंबईत पोहचले. सचिन वाझे यांनी जाणिवपूर्वक डोंगरी पोलीस स्टेशन निवडलं कारण फ्रीवे उतरल्या उतरल्या सर्वात जवळचं पोलीस स्टेशन म्हणजे, डोंगरी पोलीस स्टेशन. 


पाहा व्हिडीओ : मनसुख हिरण यांची हत्या झाल्याच्या रात्रीचा सचिन वाझेंचा EXCLUSIVE व्हिडीओ, पुरावा म्हणून वापरण्याचा होता प्लॅन



सचिन वाझे यांनी त्यांच्यावर संशय येऊ नये म्हणून पूर्ण प्लॅनिंग केली होती. ठाणे घोडबंदर येथे सचिन वाझे रात्री 9 वाजून 30 मिनिटांपर्यंत होते. त्यानंतर 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत सचिन वाझे हे ठाण्यातच असल्याची माहीती एनआयएनं दिली आहे. 10 वाजून 30 मिनिटांनी सचिन वाझे एकटेच मर्सिडीज घेऊन मुंबईच्या दिशेला गेले. फ्रीवे उतरल्यानंतर सर्वात जवळचं पोलीस स्टेशन डोंगरी येथे रेड करण्याचं कारण सांगत पोहचले. त्यांनी त्यांच्या टीममधील पीआय रियाज काझी आणि आणखी एका अधिकाऱ्याला डोंगरी पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं. 


एनआयएचं म्हणणं आहे की, याआधी सचिन वाझे आपल्या प्रत्येक रेडनंतरच पोलिसांनी बोलवायचे. पण त्या रात्री ते आधी पोलीस स्टेशनला पोहोचले आणि पोलीस स्टेशनची टीम घेऊन रेड टाकण्यासाठी गेले. त्यांचा प्लान होता की, पोलीस स्टेशनमधील पोलीस चौकशीमध्ये ते पोलीस स्टेशनला असल्याची साक्ष देतील. ज्यामुळे त्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा मिळणार नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :