ठाणे :  मनसुख हिरण हत्या प्रकरण एनआयएकडे देण्याचे निर्देश ठाणे सत्र न्यायालयाने दिल्यानंतर एनआयए अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहे. गुरूवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास सचिन वाझेंना ठाण्यातील रेती बंदर परिसरात मनसुख हिरण प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी आणण्यात आलं. 


मनसुख हिरण हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी एनआयचे पथक वाझेंना घेऊन रेती बंदर परिसरातील विसर्जन स्थळावर  दाखल झाले. यावेळी त्यांनी वाझेंसोबत येथे 10 मिनिटे पाहणी करत वाझेंची चौकशी केली. याच  विसर्जन स्थळावर व्यावसायिक मनसुख हिरण याचं शव टाकण्यात आल्याचा संशय एनआयएला होता. त्याप्रमाणे एनआयएची टीम वाझेंना पाहणीसाठी आणि घटनेचं रिक्रिएशन करण्यासाठी रेती बंदर परिसरात दाखल झाली होती. 


व्यावसायिक मनसुख हिरण यांची हत्या आरोपी विनायक शिंदे यानं केल्याची कबुली एटीएसला दिल्याचं सांगितलं जातं आहे. यावेळी जेव्हा मनसुख हिरण याला मारण्यात आलं, त्यावेळी सचिन वाझे घटनास्थळी उपस्थित होते असं एटीएसचे म्हणणं आहे. त्यामुळे रेती बंदर परिसरातील विसर्जन स्थळी एनआयएची टीम सचिन वाझेंना घेऊन दाखल झाली होती. त्यानंतर जिथे पोलिसांना व्यावसायिक मनसुख हिरण यांचा मृतदेह मिळाला त्या ठिकाणी वाझेंना नेत पाहणी केली गेली. यावेळी ओहोटीवेळी मृतदेह खाली सरकत 300 मीटर गेला आसावा असा संशय आहे. त्याआधारे ही पाहणी करण्यात आली. त्यानंतर एनआयएची टीम गायमुख चौपाटी घोडबंदर रोड येथे दाखल झाली. 


मनसुख हिरण यांचा मृत्यू होण्यापूर्वी याच ठिकाणावरून विनायक शिंदे या आरोपीला मनसुख हिरण यांनी फोन केला होता. याच प्रकरणाशी संबंधित काही धागेदोरे मिळत आहेत का या तपासासाठी घोडबंदर रोड येथे दाखल झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यानंतर पुन्हा एनआयएची टीम ठाणे मार्गाने  एनआयए कार्यालयात दाखल झाली. 


त्यामुळे मनसुख हिरण हत्या प्रकरणाचा तपास एनआयएच्या हाती गेल्यानंतर एनआयए ॲक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहे. ॲंटिलिया जिलेटीन प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हत्या प्रकरण एकमेकात गुंतल्यानं त्याचा गुंता सोडवण्यासाठी अधिक गतीनं तपास करत असल्याचं बघायला मिळत आहे.


महत्वाच्या बातम्या :