मुंबई : कोरोना विषाणूचा नियंत्रणात येणारा संसर्ग पुन्हा एकदा राज्यात फोफावू लागला आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक नागपूर यांसारख्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव अतिशय झपाट्यानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत रविवारी 3775 नवे कोरोनाबाधित आढळून आहे. ज्यामुळं बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा 3,62,654 वर पोहोचला आहे.
पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. ज्यामुळं मृतांचा एकूण आकडा 11582 वर पोहोचला. 10 रुग्णांपैकी 7जण कोमॉर्बिड रुग्ण होते.
मागील 24 तासांमध्ये 1647 रुग्णांनी कोरोनावर मात केली. ज्यामुळं आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 326708 वर पोहोचली आहे. सध्याच्या घडीला एकट्या मुंबईत 23448 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. तर, शहरात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 91 टक्के इतकं आहे. सरासरी हे प्रमाण 0.63 टक्क्यांनी वाढल्याचं सांगण्यात येत आहे. शहरात रुग्णसंख्या दुपटीचं प्रमाण हे 106 दिवसांवर पोहोचलं आहे.
धक्कादायक! पालघरच्या कारेगाव आश्रमशाळेतील 13 विद्यार्थ्यांसह 1 कर्मचारी कोरोना बाधित
मुंबईतील कंटेन्मेंट झोन
मुंबईत आतापर्यंत 40 कंटेन्मेट झोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहे. तर, 316 इमारती सील करण्यात आल्या आहेत. एकिकडे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरीही पालिका मात्र नव्यानं शहरात लॉकडाऊन किंवा संचारबंदी लावण्याच्या विचारात नाही. पण, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्यास मात्र हे चित्रही बदलण्यास फारसा वेळ लागणार नाही ही बाबही तितकीच महत्त्वाची.