मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नौदलाबाबत केलेल्या वक्तव्यावर संरक्षण दलाच्या माजी अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माजी अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेत गडकरी यांच्या व्यक्तव्याचा निषेध केला.

''याआधी कधी असा लष्कराचा अपमान झालेला नव्हता आणि एका जबाबदार मंत्र्याकडून होणं हे दुर्दैवी आहे. यामुळे संरक्षण दलाच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ शकतो'', अशी प्रतिक्रिया निवृत्त मेजर एस. के. लांबा यांनी दिली आहे.

''नौदलाने मुंबई पोर्ट ट्रस्टकडे नौदलाचे खलाशी, अधिकारी यांच्या निवासस्थानासाठी जागा मागितली, कोणत्याही शॉपिंग सेंटरसाठी मागितली नव्हती. जमीन देणं, न देणं हे गडकरी यांच्या हातात नाही. तो पूर्णपणे संरक्षण मंत्रालयाचा विषय आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता तरंगत्या हॉटेलबाबत सुरक्षेबाबतचे प्रश्न निर्माण करणाऱ्या नौदल अधिकाऱ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे'', असंही माजी अधिकारी म्हणाले.

''एक दिवस गडकरी यांनी युद्धनौकेवर किंवा सीमेवर घालवून दाखवावा'', असं आव्हानही या माजी अधिकाऱ्यांनी गडकरींना दिलं.

गडकरी नौदलावर काय म्हणाले?

नौदलाने मरीन ड्राईव्हवर होणाऱ्या तरंगत्या हॉटेलवर आक्षेप घेतला. आता मलबार हिलमध्ये आक्षेप घ्यायचं काय कारण? पण आपल्याकडे एखादा निर्णय घेतला, की त्याला विरोध करण्याची मानसिकता झाली आहे, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं. 11 जानेवारीला मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते.

संबंधित बातमी :

प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याची मानसिकता, नौदलावर गडकरींची टीका


11 Jan, 2018 4:20