मुंबई : क्रिकेटमधील इनिंग संपल्यानंतर माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी राजकारणात नवी खेळी सुरु करण्याच्या तयारीत आहेत. विनोद कांबळी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे.


भाजप मुंबईचे उपाध्यक्ष कृष्णा हेगडे यांच्या प्रयत्नानंतर विनोद कांबळी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विनोद कांबळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

विनोद कांबळी यांनी 2012 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. विक्रोळीतून लोकभारती पक्षाच्या तिकीटावर विनोद रिंगणात उतरले होते. मात्र त्यावेळी पराभव पदरी आल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. त्यानंतर कांबळी निवडणुकीच्या आखाड्यात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत.

सचिन तेंडुलकरचा बालमित्र असलेल्या विनोद कांबळी यांनी क्रिकेटमध्ये एक काळ गाजवला आहे. क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर समालोचन आणि क्रिकेट एक्स्पर्ट म्हणूनही त्यांनी हजेरी लावली होती. याशिवाय काही रिअॅलिटी शो आणि 'अनर्थ' या बॉलिवूड चित्रपटातही ते झळकले होते.

दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.