मुंबई : इस्थर अन्हुया बलात्कार आणि हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय अंतिम फैसला सुनावणार आहे. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून दोषी चंद्रभान सानपला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच दोषी चंद्रभान सानप यानेही शिक्षेविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांचं खंडपीठ यावर आपला अंतिम फैसला सुनावणार आहे.


5 जानेवारी 2014 रोजी इस्थर अन्हुया आंध्र प्रदेशातील आपल्या मूळ गावाहून मुंबईत परतली होती. रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसला ती पहाटेच्या सुमारास पोहोचली. तुला तुझ्या घरी सोडतो असं चंद्रभानने इस्थरला सांगून तिला दुचाकीवर अंधेरीऐवजी वेगळ्याच ठिकाणी नेलं. ही बाब लक्षात येताच त्याला इस्थरनं विरोध केला.

सानपने इस्थरला ईस्टर्न एक्स्प्रेसवर भांडुप परिसरातील झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. तिचा मृतदेह तिथेच जाळून टाकला. पोलिसांना तिचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला होता. विशेष महिला कोर्टाने हा प्रकार क्रूर तसेच अमानवी असल्याचं म्हणत सानपला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

कोण होती इस्थर अनुह्या?

मूळची आंध्र प्रदेशमधील असलेली इस्थर मुंबईत एका कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होती. नाताळासाठी आंध्र प्रदेशातील आपल्या गावी गेलेली इस्थर सुट्टी संपल्यानंतर रेल्वेने मुंबईत परत आली. पहाटेच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस इथे उतरलेल्या इस्थरचा काहीच पत्ता लागत नव्हता. तब्बल दहा दिवसांनी तिचा मृतदेह कांजुरमार्ग ते भांडुप दरम्यान इस्टर्न एक्स्प्रेस वे लगतच्या झुडुपामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. स्टेशनवरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी चंद्रभानला अटक केली.

इस्थरवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला होता. मे महिन्यात क्राईम ब्रँचने या प्रकरणी किल्ला कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं. आरोपी चंद्रभान सानप या प्रकरणात दोषी असून त्याच्यावर बलात्कार करणे, दरोडा, पुरावा नष्ट करणे, गंभीर दुखापत करणे असे गुन्हे लावण्यात आले होते. एकूण 542 पानांचं आरोपपत्र असून यात 42 साक्षीदार तपासले गेले.

एलटीटी स्थानकात एकट्या इस्थरला चंद्रभान सानपने गाठलं आणि आपण टॅक्सी चालक असल्याचं सांगत घरी सोडण्याचं आश्वासन दिलं. इस्थर त्याच्यासोबत जाण्यास तयार झाल्यावर त्याने एका निर्जन स्थळी गाडी थांबवून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र इस्थरने त्याला विरोध करताच त्याने तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह भांडूप जवळच्या झाडाझुडपांत टाकून दिला. मात्र पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचं आरोपीच्या वकिलांचं म्हणण आहे.