Maharashtra News : माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयानं नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागानं दिले आहेत. 


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, "असलम शेख - मढ मार्वे ₹1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितलं. मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे." 



किरीट सोमय्यांचे आरोप काय?


"अस्लम शेख यांचा एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. त्यापैकी 300 कोटींची कागदपत्र आहेत. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे, असे पाच स्टुडिओ आहेत. ज्यात CRZ नियमांच उल्लघन केलं आहे. गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी पाहणी केली, कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी पण इथे भेट दिली होती. ज्या जागेवर 2019 साली काही नव्हतं तिथं 2021 ला स्टुडिओ उभारला आहे. अस्लम शेख आणि भाटिया स्टुडिओ यांचे मालक भागीदार असल्याचं सांगितलं जातं आहे. मंग्रो तोडून स्टुडिओ उभारले आहेत. याला पर्यावरण विभागानं सहा महिन्यासाठी फिल्म सेट उभारणी साठी परवनगी दिली होती. पण अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारले आहेत.", असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, आदित्य ठाकरे यांनी याला भेट दिली त्याचे फोटो आहेत ते आम्ही योग्य वेळी दाखवू. या प्रकरणात कोस्टल झोन ऑथेरीटी यांना पत्र लिहिलं आहे. यावर तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. 


सोमय्यांच्या आरोपानंतर अस्लम शेख यांनी घेतली होती देवेंद्र फडणवीसांची भेट 


किरीट सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यापैकी 300 कोटी प्रकरणी कागदपत्र संबंधित यंत्रणांकडे दिल्याचा सोमय्यांनी दावा केला होता. किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतंच अस्लम शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी अस्लम शेख यांच्यासोबतच भाजप नेते मोहित कंबोज देखील उपस्थित होते. एकाच गाडीतून हे दोघेही फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. यावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या.