Maharashtra Rains : विश्रांती घेतलेल्या पावसाचा (Rain) जोर पुन्हा एकदा वाढला आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्यानं कही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे परिसरासह राज्यातील नांदेड, नाशिक, लातूर, अहमदनगर या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विशेषत: मराठवाड्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून काही ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता देखील सांगण्यात आली आहे.


सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. राज्यातील नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ जावू शकतात. त्यामुळं नद्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी या कालावधीत सतर्क राहावे. कारण पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. 


नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस


नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. बेलदरा, हातनी, येंडाळा, महाटी, कौडगाव जाणाऱ्या अरुंद व उंची कमी असलेल्या पुलावरून पाणी गेल्याने जवळपास 500 पेक्षा अधिक नागरिक चार तास पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. दरम्यान काही नागरिकांनी नाहक धाडस दाखवत, पुराच्या पाण्यातून जोखमीचा प्रवास करत पुल ओलांडला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे उमरी तालुक्यातील रस्त्यांची मात्र दयनीय अवस्था झाली आहे. तर अरुंद रस्ते आणि पुलाची उंची कमी असल्याने चांगला पाऊस झाला की पुलावरुन पाणी वाहते आणि रस्ता बंद होतो. त्यातच आज झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे बेलदरा, हातनी या मार्गावरील पुलाला अचानक पूर आल्याने रस्ता बंद झाला. त्यामुळे नागरिक अडकून पडले होते.
 
तळकोकणात मान्सून पुन्हा सक्रिय


सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे. सिंधुदुर्गात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याम पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. रात्रीपासून जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट तर दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.