मुंबई : वाढदिवसानिमित्त होणाऱ्या बायकोसोबत फिरायला गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरवर दुर्दैवाने पोलिस स्टेशन गाठण्याची वेळ आली. मात्र बर्थडेला तक्रारदार तरुणाला होणारा मनस्ताप पोलिसांना पाहवला नाही आणि त्यांनी चक्क पोलिस स्टेशनमध्येच तरुणाचा वाढदिवस साजरा केला.
मुंबईत राहणारा अनिश जैन हा 28 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर होणाऱ्या बायकोसोबत फिरायला गेला होता. शनिवारी वाढदिवसानिमित्त दोघांनी घाटकोपरमध्ये सिनेमाला जाण्याचा प्लॅन केला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास अनिशची कार साकीनाक्याजवळ सिग्नलला थांबली असताना एका टेम्पोने त्यांना मागून धडक दिली.
सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र त्याच्या कारचं नुकसान झालं. वाहन विम्यासाठी दावा करायचा असल्यास कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असल्याचं अनिशला माहित होतं. त्यामुळे टेम्पो चालकासह अनिश जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार करण्यासाठी दाखल झाला.
'पोलिसांनी टेम्पो आणि कारची पाहणी केली आणि घटनेची माहिती जाणून घेतली. ही लेखी प्रक्रिया असल्यामुळे आमचे किमान दोन तास गेले. बोलता-बोलता, माझा वाढदिवस पोलिस स्टेशनमध्ये घालवेन, असं कधी वाटलं नव्हतं' असं सांगितल्याचं अनिश जैन म्हणाला.
'पोलिसांनी हसत-हसत वाढदिवस पोलिस स्टेशनमध्ये घालवणं काहीच गैर नसल्याचं सांगितलं. त्यांनी लगेच मिठाई मागवली आणि वाटली. कारच्या अपघातामुळे माझ्या मनावर आलेला तणाव निवळला.' असं अनिशने सांगितलं. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन हा फोटो शेअरही केला आहे.
https://twitter.com/MumbaiPolice/status/919230215016108032
मुंबईत पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदार तरुणाचं बर्थडे सेलिब्रेशन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2017 11:01 AM (IST)
वाहन विम्यासाठी दावा करायचा असल्यास कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असल्याचं अनिशला माहित होतं. त्यामुळे टेम्पो चालकासह अनिश जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार करण्यासाठी दाखल झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -