मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची चौकशी करणारे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी (ED)पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास हस्तक इक्बाल मिर्ची याच्या जप्त केलेल्या जागेत ईडीचे नवीन कार्यालय होणार आहे. एकेकाळी ड्रग्ज तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या जागेत आता ईडीचे कार्यालय उभा राहणार आहे.
ईडीचे कार्यालय इक्बाल मिर्ची याने खरेदी केलेल्या वरळी येथील सीजे हाऊस येथे स्थलांतरित होत आहे. हे मुंबईतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. सध्या ईडीचे कार्यालय दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथे आहे.
ईडीने इक्बाल मिर्चीच्या 15 मालमत्ता जप्त करण्याची परवानगी देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये सीजे हाऊसमधील 2 मजले देखील समाविष्ट होते. इक्बाल मिर्चीच्या या संपत्तीची एकूण किंमत शंभर कोटींहून अधिक होती. अलीकडेच ईडीने 14 हजार स्क्वेअर फूट पसरलेल्या दोन या मजल्यांचा ताबा घेतला होता. ही मालमत्ता तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आहे. संचालनालयाचे अधिकारी या नवीन कार्यालयात आवश्यक ते बदल करत आहेत. ईडीने दिलेल्या माहितीनुसार ही जागा आता सरकारी मालमत्ता झाली आहे.
सीजे हाऊसच्या आधी हे ठिकाण वरळीचे प्रसिद्ध गुरुकृपा हॉटेल होते. हे हॉटेल सी साइड इन आणि ललित रेस्टॉरंट म्हणूनही ओळखले जात असे. हे हॉटेल एम. के. मोहम्मदच्या नावाने होती. त्यांचा शेजारील जमीन मालकाशी वाद सुरू होता. 1986 मध्ये इक्बाल मिर्ची याने ही मालमत्ता मोहम्मदकडून दोन लाख रूपयांना विकत घेऊन पहिली पत्नी हाजरा हिच्या नावावर केली होती. नंतर मिर्चीने गॅरेज आणि मालमत्तेला लागून असलेली इमारत अतिक्रमण करून तेथे पब सुरू केला. मात्र, नंतर त्याला हा पब बंद करावा लागला. तेथून तो तो ड्रग्जचा काळा धंदाही करत होता.
नंतर मिर्चीने ही मालमत्ता मिलेनियम डेव्हलपर्सला विकली. बिल्डरने मिर्ची फॅमिलीला तिसऱ्या मजल्यावर 9 हजार स्क्वेअर फूट आणि चौथ्या मजल्यावर 5 हजार स्क्वेअर फूटाचे फ्लॅट्स दिले होते. यातच ईडी आता आपले कार्यालय बनवत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Deltacron : धोका वाढला! 'या' देशात सापडला कोरोनाचा नवा 'डेल्टाक्रॉन व्हेरियंट'
- Booster Dose : आजपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांना 'बूस्टर'
- Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना संसर्गवाढीचा आलेख वाढताच; रविवारी 44 हजार 388 रुग्णांची नोंद