ठाणे : एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शर्मा यांनी 4 जुलै रोजी राजीनामा दिला असून अद्याप तो स्वीकारलेला नाही. प्रदीप शर्मा सध्या ठाणे क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत होते. प्रदीप शर्मा 2008 मध्ये पोलिस दलातून निलंबित झाले होते. नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑगस्ट 2017 मध्ये पोलिस सेवेत ते पुन्हा परतले होते.


दरम्यान, राजीनाम्यानंतर प्रदीप शर्मा राजकारणात प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. लवकरच्या ते शिवसेनेत प्रवेश करतील.

पोलिस दलात 1983 साली दाखल झालेले पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द कायम वादात राहिली. ऐंशी-नव्वदच्या दशकात मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांनी हातपाय पसरले असताना, अंडरवर्ल्ड राज संपवण्यासाठी पोलिसांनी एन्काऊंटर मोहिम हाती घेतली होती.

प्रदीप शर्मा यांनी 312 एन्काऊंटरमध्ये भाग घेत, 100 हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केलं आहेत. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध या आरोपातून शर्मा यांना 2008 मध्ये पोलिस दलातून निलंबित करण्यात आलं होतं. लखन भय्या एन्काऊंटर प्रकरणी शर्मा यांच्यासह 13 जणांना अटकही करण्यात आली. मात्र 2013 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपांतूनही त्यांची मुक्तता झाली.

आपल्याला पुन्हा सेवेत रुजू करुन घ्यावं, यासाठी शर्मा यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती. अनेक महिने शर्मा यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने ते राजकारणात प्रवेश करणार, अशीही जोरदार चर्चा होती. मात्र त्याआधीच गृहखात्याने शर्मा यांना पुन्हा सेवेत दाखल करुन घेतलं होतं.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचं धडाक्यात कमबॅक

113 एन्काऊंटर
- 1983 बॅचचे पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा सर्व्हिस रेकॉर्ड वादांनी भरलेला आहे.
- प्रदीप शर्मा यांच्या नावावर 100 पेक्षा जास्त (113) एन्काऊंटरची नोंद आहे. 'अब तक 56' हा सिनेमात प्रदीप शर्मा यांच्यावर आयुष्यावर बनला होता.
- शिक्षकाचा मुलगा असलेल्या प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर 'रेगे' नावाचा मराठी चित्रपटही बनला आहे.

गुन्हेगारांचा कर्दनकाळ -प्रदीप शर्मा
- एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा 1983 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून मुंबई पोलिसात रुजू झाले होते.
- माहिम पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी नोकरीची सुरुवात केली. यानंतर काही वर्षांसाठी त्यांची बदली स्पेशल ब्रांचमध्ये झाली होती.
- प्रदीप शर्मा यांच्याकडे घाटकोपर आणि जुहू पोलिस स्टेशनचाही चार्ज होता.
- असं म्हटलं जातं की, त्यावेळी घाटकोपर पोलिस स्टेशनचा चार्ज घेण्यास कोणीही सहसा तयार होत नसे. पण प्रदीप शर्मा यांनी चार्ज घेतल्यानंतर गुन्हेगारांनी त्या परिसरापासून दूर राहणंच पसंत केलं.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 9 वर्षांनंतर पुन्हा पोलिस सेवेत दाखल

मुंबईत प्रदीप शर्मा यांचा बोलबाला
- प्रदीप शर्मा यांनी मुंबईत पाऊल ठेवलं त्यावेळी गुन्हेगारी टोळ्यांनी हातपाय पसरले होते. दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांसारखे मोठमोठे गुन्हेगार पोलिसांच्या हिट लिस्टवर होते.
- इथे येताच शर्मा यांनी आपली नजर गुन्हेगारांवर वळवली. त्यांनी गुन्हेगारांचं एन्काऊंटर केलं, यानंतर मुंबईत त्यांच्या नावाचा बोलबाला
झाला.
- मात्र 2008 मध्ये प्रदीप शर्मा यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप झाला. यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी प्रदीम शर्मांना मुंबई पोलिसातून निलंबित केलं होतं.
- निलंबनाविरोधात प्रदीप शर्मा यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादात आव्हान दिलं होतं. पण त्याचा निकाल येण्याआधीच 2010 मध्ये प्रदीप शर्मा यांना छोटा राजन टोळीतील लखन भय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात अटक झाली होती.
- जुलै 2013 मध्ये मुंबईतील कोर्टाने पुराव्यांअभावी त्यांची या आरोपातून सुटका केली. अखेर 17 ऑगस्ट 2017 रोजी ते ठाणे पोलिसात रुजू झाले.
- प्रदीप शर्मा यांच्या नावावर 100 हून अधिक एन्काऊंटरचा रेकॉर्ड आहे, ज्यात लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचाही समावेश आहे.

जन्म आग्र्यातला, धुळ्यात शिक्षण
- प्रदीप शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये झाला होता. त्यांचे वडील महाराष्ट्रातील धुळ्यात हिंदी मीडियम शाळेचे मुख्याध्यापक होते.
- त्यांनी एमएससीपर्यंतचं शिक्षण धुळ्यातूनच पूर्ण केलं. यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाची परीक्षा दिली. पास झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्र पोलिसात निवड झाली.

मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांचा राजीनामा, भाजप किंवा आपकडून लोकसभेच्या रिंगणात?

गँगस्टर विनोद मातकरच्या एन्काऊंटरमुळे प्रसिद्धी
- क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेल्या प्रदीप शर्मा यांनी कुख्यात गँगस्टर विनोद मातकरचा एन्काऊंटर केल्यानंतर ते एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध झाले.
- विनोद मातकरशिवाय प्रदीप शर्मा यांनी परवेझ सिद्दीकी, रफीक डब्बावाला, सादिक कालिया या गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला.
- यानंतर मुंबईला हादरवण्याचा कट रचणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा एन्काऊंटर केला.
- प्रदीप शर्मा यांच्यानुसार, त्यांनी आपल्या 25 वर्षांच्या नोकरीत 100 पेक्षाही जास्त एन्काऊंटर केले आहेत.