मुंबई : मुंबईतील जेजे रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाने शस्त्रक्रिया करुन यवतमाळच्या 27 वर्षांच्या रुग्णाचा गेलेला आवाज परत आणला आहे. रुग्णाला नीट बोलता येत नव्हतं, त्याच्या गळ्यात एक यंत्र बसवण्यात आलं होतं. ज्यामुळे बोलताना त्याला या यंत्रावर हात ठेवून हवेचा वापर करत एका विशिष्ट पद्धतीने बोलावं लागत होतं. अशा रुग्णाची शस्त्रक्रिया करून त्याला आता पूर्णपणे बोलणं शक्य झालं आहे.


आपली श्वसनयंत्र आणि स्वरयंत्राची समस्या घेऊन हा रुग्ण मुंबईतील जे. जे. रुग्णालयात आला. जे. जे. रुग्णालयात या रुग्णाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आला. या तरुणाला दोन वर्षांपूर्वी शेतात काम करत असताना विषबाधा झाली होती. त्यावेळी त्याला श्वास घेता येत नव्हता, त्यामुळे श्वसननलिकेत ट्रकियोस्टोमी (गळ्यावर छेद करून ट्युब आत टाकणे) करून यंत्र बसवण्यात आलं.

त्याच्या श्वसनाची समस्या दूर करण्यासाठी त्याच्या गळ्यात यंत्र बसवण्यात आलं. मात्र त्यामुळे त्याला आता नीट बोलता येत नव्हतं. बोलण्यासाठी त्याला यंत्रावर हात ठेवून हवेचा वापर करत एका विशिष्ट पद्धतीनं बोलावं लागत होतं.

जे. जे. रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण या रुग्णावर लॅरिंगोट्रकीएल रिकन्स्ट्रक्शन (Laryngotracheal reconstruction) शस्त्रक्रिया केली. अशाप्रकारची शस्त्रक्रिया खूप कमी केली जाते. खासगी रुग्णालयात या सर्जरीसाठी लाखो रुपये खर्च येतो.

स्वित्झर्लंडचे डॉक्टर फिलिप मुनियार यांच्यासह डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी ही 10 जुलै रोजी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. सर्जरीनंतर 24 तासातच या व्यक्तीला त्याचा आवाज मिळाला आहे.

आम्ही रुग्णाच्या श्वासनलिकेचा हानी पोहचलेला भाग काढून टाकला उरलेला भाग रिकन्स्ट्रक्ट केला आहे. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला त्याचा आवाज पुन्हा मिळाला आहे. आता तो सामान्य माणसासारखा बोलू शकतो, असं डॉ. श्रीनिवास चव्हाण म्हणाले.