मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना एनआयएने (NIA)अटक केली आहे. सात तासांच्या चौकशीनंतर प्रदीप शर्मा यांना अँटिलियाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. सकाळी सहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घराची झाडाझडती केली. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन बेड्या ठोकण्यात आल्या. एनआयएच्या ताब्यातील सचिन वाझे आणि संतोष शेलार यांच्या चौकशीत प्रदीप शर्मा यांचं नाव आल्याने एनआयएने आजची कारवाई केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मनसुख हिरण यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 


लोणावळ्यातील मोठ्या रिसॉर्टमधून प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. त्याआधी त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल. 


मनसुख हिरण यांच्या हत्येचा मास्टरमाईंड प्रदीप शर्मा होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अटकेत असलेल्या विनायक शिंदे, संतोष शेलार आणि आनंद यादव यांच्यासह आणखी दोघांनी मनसुख हिरण यांचं अपहरण करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह रेतीबंदर खाडीत टाकला. हे सगळे प्रदीप शर्मा यांच्या जवळचे आहेत. प्रदीप शर्मा यांनी त्यांना पैसे आणि गाडी दिली. प्रदीप शर्माने या सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या."




 

उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर फेब्रुवारी महिन्यात जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारसपणे सोडण्यात आली होती. त्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून प्रदीप शर्मा यांचं नाव समोर आलं. प्रदीप शर्मा हे सचिन वाझे यांच्या जवळचे समजले जातात. यानंतर प्रदीप शर्मा यांचीही एनआयएने एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस चौकशी केली होती. काही महिने हे चौकशी थांबली होती. परंतु आज सकाळी एनआयएने सीआरपीएफच्या ताफ्यात मुंबईच्या अंधेरीतील त्यांच्या घरावर छापा टाकून झाडाझडती सुरु केली. अनेक तासांच्या झाडाझडती आणि चौकशीनंतर अखेर त्यांना अटक करण्यात आली.


कोण आहेत प्रदीप शर्मा?
- प्रदीप शर्मा 1983 साली पोलीस सेवेत रुजू झाले
- पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख
- 312 गुंडांचा प्रदीप शर्मा यांच्याकडून एन्काऊंट
- कुख्यात गुंडांशी त्यांचा संबंध असल्याचाही आरोप
- 2008 मध्ये पोलीस दलातून निलंबन
- 2017 मध्ये आरोपांतून क्लीनचिट
- 2017 साली त्यांनी दाऊदच्या भावाला अटक केली
- 2019 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा
- नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली
- मुंबईत अँटिलियाबाहेर स्फोटकं सापडल्याप्रकरणी एनआयएकडून चौकशी आणि अटक


अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणात आतापर्यंत प्रदीप शर्मा यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस दलातून निलंबित झालेले सचिन वाझे, रियाज काझी, सुनील माने यांच्यासह विनायक शिंदे, संतोष शेलार, आनंद यादव यांचा समावेश आहे.