मुंबई : शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रसाद मिळणारच, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत बुधवारी (16 जून) झालेल्या राड्यावर दिली. राम मंदिरासंदर्भात 'सामना'त केलेल्या टीकेवर काल भाजपने शिवसेना भवनासमोर निषेध आंदोलन केलं. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथे जमले आणि दोन्ही गटात तुफान राडा झाला. यावर प्रतिक्रिया विचारली असताना संजय राऊत यांनी शिवसेना भवनाकडे वाकडी नजर टाकणाऱ्यांना प्रसाद मिळतच राहणार असल्याचं म्हटलं.


शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, "जेव्हा जेव्हा शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तेव्हा तेव्हा अशाप्रकारचा राडा झाला आहे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. ती बाळासाहेब ठाकरे यांची वास्तू आहे. त्याच्यावर चाल करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवसैनिक आणि मराठी माणूस गप्प बसेल का? शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रसाद मिळणारच हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो."


भाजपला टीका का झोंबली? : संजय राऊत
राम मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप झाला आहे. जर ते आरोप राम मंदिराबाबत बदनामीसाठी केले असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा असं 'सामना'च्या अग्रलेखातून स्पष्ट म्हटलं आहे. भाजपवर थेट आरोप केलेला नाही. मग ही टीका भाजपला का झोंबली? राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास ही स्वायत्त संस्था आहे, त्यात भाजपचे कार्यकर्ते आहेत का? श्रद्धेच्या वास्तूबाबत खुलासा विचारणं हा गुन्हा झाला का? असे सवाल संजय राऊत यांनी विचारले. तसंच "ज्यांनी काल हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. आमच्याकडून विषय संपलेला आहे," असंही त्यांनी म्हटलं.


Mumbai BJYM Protest : राममंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले, शिवसेना भवनाजवळ गोंधळ


मुंबईत शिवसेना भवनाबाहेर काय घडलं?
अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करुन शिवसेनेने हिंदू धार्मिक स्थळ आणि हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला असल्याचं म्हणत भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे काल शिवसेनेविरोधात "फटकार मोर्चा" आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजयुमो आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने गोंधळ उडाला. दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले.


मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले की, "सत्तेत राहण्यासाठी आणि खुर्ची कायम ठेवण्यासाठी शिवसेना सोनिया सेना बनून कॉंग्रेसच्या इशाऱ्यावर पूर्णपणे नाचत आहे. सत्तेच्या लोभाने शिवसेनेला अशा प्रकारे अंधत्व आले आहे की आता ते हिंदू धर्म, आस्था असलेल्या भगवान श्री राम मंदिरात हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीविरुद्ध राजकीय षडयंत्र रचत आहेत. हिंदू आणि आमच्या श्रद्धेवर हा हल्ला आहे. हा मोर्चा आपल्या तरुणाईच्या बाजूने आहे. धर्मातून परके झालेली शिवसेनेला फटकार आहे, आपल्या क्षुल्लक राजकारणासाठी आमच्या धर्मावर आणि आस्थेवरील आक्रमण थांबवा."


बाबरी मज्जिद जेव्हा पाडण्यात आली तेव्हा शिवसेनेने गर्वाने पुढे आली आणि आता भाजप फक्त विनाकारण याचा राजकारण करत आहे, असं यावेळी आमदार सदा सरवणकर आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी म्हटलं आहे. शिवसेना भवनावर दगड धोंडे घेऊन येत असताना आम्ही गप्प बसणार नाही. सेना भवनाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू नये. शांतपणे आंदोलन केलं असतं तर आम्ही कुठलाही आक्षेप घेतला नसता. हे भाजपने जाणूनबुजून केलं आहे, असं सरवणकर म्हणाले. तर कोणीही महिलांवर हल्ला केलेला नाही. पोलीस तिथे उपस्थित होते, असं श्रद्धा जाधव म्हणाल्या.