कामगारांकडून मालकाचे अपहरण करुन हत्या
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर | 13 May 2019 11:01 PM (IST)
पारघरमधील अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहमद अली यांचे चार दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या केल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.
पालघर : पारघरमधील अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहमद अली यांचे चार दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या केल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी आरिफ यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या तीन कामगारांना पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ त्यांच्या कंपनीतील कामगार प्रशांत संखे, रामदेव संखे आणि प्रशांत महाजन यांनी आरिफ यांची हत्या करुन मृतदेह जाळल्याची कबुली दिली आहे. या तिघांना वापी आणि अमळनेर येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरिफ यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. संखे आणि महाजन यांनी व्यावसायिक वादातून आरिफ यांचे अपहरण करुन हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेचा तपास करण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. 9 मे रोजी दुपारी 2 च्या सुमारास पालघर येथील जुना सातपाटी रोड येथून आरिफ यांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर प्रत्येक्षदर्शींच्या तक्रारीनुसार पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि या प्रकरणात तिघांना अटक केली आहे.