कल्याण : महाराष्ट्राची राज्यस्तरीय कॅरमपटू जान्हवी मोरे हिचं रविवारी अपघाती निधन झालं. डोंबिवलीच्या पलावा सर्कल इथे भरधाव टँकरच्या धडकेत जान्हवीचा मृत्यू झाला.


19 वर्षीय जान्हवी ही डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये वास्तव्याला होती. रविवारी आपल्या सहकारी खेळाडूसह सराव करुन ती पलावा सर्कलच्या बसस्टॉपकडे जात होती. याचवेळी भरधाव वेगात आलेल्या टँकरने तिला धडक दिली आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेजमध्ये शिकणारी जान्हवी ही सध्या बँक ऑफ इंडियाकडून खेळत होती. अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय कॅरम स्पर्धांमध्ये तिने पदकांची कमाई केली होती. तर काही महिन्यांनी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र त्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला.

जान्हवीच्या मृत्यू प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी टँकरचालक रोहिदास बटुळे याला अटक केली आहे. या घटनेमुळे डोंबिवलीत हळहळ व्यक्त होतेय.

चौदावीत शिकत असलेल्या जान्हवीला तिचे वडील सुनील मोरे यांनी कॅरम खेळण्यासाठी नेहमीच उत्तेजन दिलं. तिच्या पश्चात घरी तिचा लहान भाऊ, आई आणि वडील असा छोटासा परिवार आहे. आज सकाळी 11 वाजता डोंबिवलीत तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला.

नेहमी हसतमुख राहणाऱ्या मृदु भाषी जान्हवीला अंतिम निरोप देण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड व मुंबईतील अनेक कॅरम खेळाडू व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. जान्हवीच्या आकस्मित जाण्याने कॅरम क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.