एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचे कुटुंबीय, जखमींना रेल्वेची मदत
एबीपी माझा वेब टीम | 14 Mar 2018 08:39 AM (IST)
एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी आठ लाख, गंभीर जखमींना सात लाख तर किरकोळ जखमींना दोन लाख रुपये रेल्वेतर्फे देण्यात आले.
मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितांना अखेर रेल्वेकडून आर्थिक मदत मिळाली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी आठ लाख, गंभीर जखमींना सात लाख तर किरकोळ जखमींना दोन लाख रुपये देण्यात आले. 29 ऑगस्टला एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीत 23 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर एल्फिन्स्टन पुलाचं बांधकाम लष्कराकडे सोपवण्यात आलं. लष्कराकडून तीन महिन्यांमध्ये हा पूल बांधून प्रवाशांसाठी सुरु करण्यात आला. साडेसहा महिन्यांनंतर रेल्वेकडून मदतीचा हात देण्यात आला. 17 मृत आणि 19 जखमी अशा 36 पीडितांना ही आर्थिक मदत करण्यात आली. विशेष केस म्हणून एल्फिन्स्टन दुर्घटनेची सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करण्यात आली. मोदी सरकारकडून या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना चार ऐवजी आठ लाख, गंभीर जखमींना चार ऐवजी सात लाख तर किरकोळ जखमींना दोन लाख रुपये देण्यात आले आहेत.