कल्याण : कल्याण शहरातल्या डम्पिंग ग्राऊंडला गेल्या ४ दिवसांपासून लागलेली आग अजूनही धुमसतीच आहे. आग विझवण्याचे सगळे प्रयत्न अपयशी होताना दिसत आहेत. त्यामुळं नागरिक अक्षरशः बेहाल झाले आहेत. प्रशासन लक्ष देत नसल्यानं कुणीही वाली उरला नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होते आहे.

कल्याणचं आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड गेल्या 4 दिवसांपासून धुमसतं आहे. धुराचे लोट संपूर्ण शहरात पसरले आहेत. यामुळे नागरिकांना श्वसनाचा, दम्याचा त्रास सुरु झाला आहे.

प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न होता आहेत. पण जी माणसं कचरा वेचून त्याचं वर्गिकरण करतात. त्याच डम्पिंग ग्राऊंड शेजारच्या साठेनगरातल्या 1500 नागरिकांकडे दुर्लक्ष होत आहे.

धुराचा त्रास होत असल्यास नागरिकांनी घर सोडून जावं. असा अजब सल्ला आयुक्तांनी दिला आहे.

परदेशात कचऱ्यातून सोनं पिकवलं जातं. आपल्याकडे विल्हेवाट लावण्यासाठी आग लावली जाते. पण या कचऱ्यावर वेळीच प्रक्रिया केली. तर ना आग लागेल ना आरोग्य धोक्यात येईल.