मुंबई: आम्ही गद्दार नाहीत तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत, आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही बापाचे विचार विकले, बापालाच विकण्याचा प्रयत्न केला असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांनी विचारला. 


एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही गद्दार नव्हे तर तुम्हीच गद्दार आहात. तुम्ही वैचारिक व्याभिचार केला, विचारांशी पाप केलंय. त्यासाठी पहिला बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं ठेवा, मग आमच्यावर टीका करा. शिवसेना उभारण्यासाठी आम्ही 40 वर्षे काम केलं, आंदोलनं केली, लाठ्या-काठ्या खाल्ल्या. आता आम्हाला गद्दार म्हणता? बाळासाहेबांकडे बघून आम्ही गप्प बसलो. अडीच वर्षांपूर्वीच अनेक आमदारांनी सांगितलं होतं की ही आघाडी योग्य नाही. पण आम्ही सहन केलं. पण बाळासाहेबांचे विचार खु्ंटीला टांगल्यानंतर आम्ही गप्प बसणं शक्य नव्हतं. 


मुंबई बॉम्बस्फोटातील याकूब मेमनला न्यायालयाने फाशी दिली, त्या मेमनची फाशी रद्द करा म्हणणाऱ्याला तुम्ही मंत्रीपद दिलं असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही बापाचे विचार विकले, बापालाच विकण्याचा प्रयत्न केला,आम्ही जे केलं ते राज्याच्या भल्यासाठी केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


म्हणून हे महाभारत घडलं...


उद्धव ठाकरे यांनी एवढे आमदार, खासदार आणि पदाधिकारी का सोडून गेले याचा विचार करावा, आत्मपरीक्षण करावं असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, "कोरोना काळात सगळं काही बंद होतं, पण तुमची दुकानं सुरू होती. ती दुकानं कसली होती ती मला माहिती आहे. मुख्यमंत्री म्हणून तुमच्या नावापुढे पाटी लागली त्यावरच तुम्ही समाधानी झाला. सेनेचे झेंडा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अजेंडा असा प्रकार मंत्रालयात सुरू होता. मुख्यमंत्री शिवसेनेचा, पण शिवसेनेलाच संपवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्यावेळी धृतराष्ट्राच्या भूमिकेत जाऊन संजय सांगेल तेवढंच ऐकला. म्हणून हे महाभारत झालं."


एकनाथ शिंदे म्हणाले की, "अडीच वर्षात अडीच तास तुम्ही मंत्रालयात गेला. आमदार आणि खासदार सोडून गेल्यानंतरही तुमचे डोळे उघडत नाहीत. चहावाला म्हणून तुम्ही ज्यांची खिल्ली उडवली ते कुठे आहेत आता याचा विचार करा. नरेंद्र मोदी यांनी जगामध्ये भारताचं नाव केलं. या देशाचा पंतप्रधानाची तुम्ही टिंगल करताय? "