मुंबई : आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पक्षाच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. पालिका निवडणुकीत (BMC Election) वाटाघाटीवेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. कोण कोणाशी युती करतंय त्याची चिंता करू नका, त्यांची सर्व गणितं आपल्यापकडे आहेत, असा टोलाही शिंदेंनी ठाकरे बंधूंना लगावला. पालिका निवडणूक जिंकण्याचा निश्चयाने दसरा मेळाव्यात गर्दी करा, असं आवाहनही शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना केलं.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या निवडणुकीची जबाबदारी शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तसेच जिंकण्याची शाश्वती असलेल्या जागाच मागण्यात येतील असंही निश्चित झाल्याची माहिती आहे.
Eknath Shinde Shivsena Melava : शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांवर जबाबदारी
महापालिका निवडणुकीत जागावाटप होताना आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, महापालिका जिंकण्याच्या उद्देशाने कामाला लागा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात शेवटी येईल. विचार, विकास आणि विश्वास या त्रिसूत्रानुसार काम करा. पालिका निवडणुकीची कमान शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांवर असेल. जर काही नेमणुका राहिल्या असतील तर त्या करून घ्या अशा सूचना शिंदेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
Eknath Shinde On Thackeray Brothers : त्यांची गणितं आपल्याकडे
महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे युती करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. कोण कोणाशी युती करतंय त्याची चिंता करू नका, त्यांची सगळी गणितं आपल्याकडे आहेत असा टोला शिंदेंनी लगावला.
BMC Election News : हा नोकर आणि मालकाचा पक्ष नाही
एकनाथ शिंदे म्हणाले की, "पूर भागात मंत्र्यांचे दौरे झाले. आता खासदार, आमदार, पदाधिकारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर जातील. संकट दिसलं की मदतीला धावून जा, तो खरा शिवसैनिक. निमंत्रणाची वाट बघू नका. हा पक्ष नोकर आणि मालकाचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्याचा आह., शिस्त ही शिस्त आहे. 'शिवसेना'या अक्षरांना गालबोट लागता कामा नये."
मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा होतोय. त्यामुळे पालिका निवडणूक जिंकण्याच्या निश्चयाने गर्दी करा अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी केल्या.