मुंबई: अँटिलिया बॉंबस्फोट (Antilia Case) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiren Murder Case) आरोपी असलेल्या बुकी नरेश गौरला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. नरेश गौरची दोषमुक्तीची याचिका मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं फेटाळली. विशेष न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी हा निर्णय दिला. नरेश गौरनं मुख्य आरोपी सचिन वाझेच्या (Sachin Vaze) सांगण्यावरून सिमकार्ड पुरवल्याचा तपासयंत्रणेचा आरोप आहे. 


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकांनी भरलेली SUV सापडली होती. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझेसह नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत आहे. 


Antilia Case: काय आहे प्रकरण? 


25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ कार प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. कारण यानंतर अनेक नाट्यमय घटना घडत गेल्या होत्या. उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारसपणे सोडण्यात आली होती. नंतर या गाडीचा मालक मनसुख हिरेन याची हत्या करण्यात आली होती. 


मनसुख हिरण याचा मृतदेह 5 मार्च 2021 ला मुंब्य्राजवळील खाडीत सापडला होता. त्यानंतर मनसुख हिरण याची हत्या सचिन वाझेंनीच केल्याचा आरोप त्याच्या कुटुबीयांकडून करण्यात आला होता. हा तपास एटीएसकडून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे देण्यात आला. या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे, प्रदीप शर्मासह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.


अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेने वसुली केलेल्या पैशांचा वापर: NIA


अँटिलिया तसेच आणि मनसुख हिरेन प्रकरणाला अंतिम स्वरुप देण्यासाठी बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेने वसुल केलेल्या पैशांचा वापर करण्यात आल्याचं एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये नोंद केली आहे. अँटिलिया प्रकरणानंतरच परमबीर सिंह यांच्यावर 100 कोटी रुपये वसूल करण्याचा आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला होता. ही वसुली सचिन वाझे करत असल्याचं सांगितलं गेलं. 


सचिन वाझेने केलेल्या वसुलीच्या पैशाचा वापर हा अँटिलिया प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणात वापरण्यात आला आहे असा दावा एनआयएने केला आहे. 


ही बातमी वाचा: