मुंबई: जावयाच्या लिमोझीनवरून आरोप करणाऱ्या अंजली दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा एकनाथ खडसेंनी दिला आहे. अंजली दमानियांनी पैसे घेऊन माझ्यावर आणि माझ्या जावयावर आरोप लावले असल्याचं खडसे म्हणाले. दमानियांनी लावेलेले आरोप सिद्ध झाले तर मी महाराष्ट्राची माफी मागेन असंही खडसे म्हणाले.

 

एवढचं नव्हे तर दमानियांचा बोलवता धनी वेगळाच असल्याचा खडसेंचा आरोप आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनी आरटीओचे नियम पायदळी तुडवून सोनाटा कार लिमोझिनमध्ये म़ॉडिफाईड केल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. तसंच खडसेंच्या जावयांची लिमोझिन लवकरात लवकर जप्त करण्याची मागणी देखील दमानियांनी केली आहे.

 

“भाजप सरकार एकनाथ खडसेंच्या जावयाची MH 19 AQ 7800 ही अवैध सोनाटा लिमोझिन कार जप्त करणार का?” असा सवाल दमानियांनी केला आहे.

 

अंजली दमानिया यांनी ट्विट करुन ही मागणी केली आहे. खडसेंच्या जावयाची लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा दमानियांनी केला आहे.

 

संबंधित बातम्या:

 

'खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा'