पावसाचा फटका, अंड्यांच्या किंमतीत मोठी वाढ!
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 13 Jul 2018 05:37 PM (IST)
डझनामागे अंड्यांच्या किंमती या 20 रुपयांनी वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे. एका अंड्याची किंमत 1.66 रुपयांनी वाढली आहे.
नवी मुंबई : किरकोळ मार्केटला 55 रूपये डझन मिळणारी अंडी आता 75 रूपये डझनावर जाऊन पोहोचली आहेत. डझनामागे अंड्यांच्या किंमती या 20 रुपयांनी वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे. राज्यात आणि मुंबईत गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसाचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. यामुळे मुंबई आणि उपनगरात जीवनावश्यक वस्तू पोहोचण्यात अडचण झाली. यामध्ये अंड्याला मोठा फटका बसला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमध्ये दिवसाला 80 ते 90 लाख अंड्यांची गरज असते. मात्र आठवडा होऊनही अंड्यांचा पुरवठा कमी झाल्याने किंमती वाढल्या आहेत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे अंड्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. अंड्यांच्या किंमती कधीपर्यंत कमी होतील याबाबत अजून कुणीही बोलण्यास तयार नाही.