मुंबई : 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' ही जाहिरात आपल्याला चांगलीच परिचित आहे. मात्र आता 'संडे हो या मंडे रोज कैसे खाओ अंडे?' असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण मुंबईच्या घाऊक बाजारात अंड्याचे दर प्रतिडझन 80 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. म्हणजे एका अंड्याला साधारण 7 रुपये मोजावे लागणार आहेत.


अंड्याची मागणी सध्या जास्त प्रमाणात आहे आणि अंड्यांचा पुरवठा मात्र कमी आहे. त्यामुळे अंड्याची किंमत वाढल्याचं म्हटलं जात आहे. देशी अंड्याचे भावही 120 रुपये डझनवर पोहोचले आहेत. म्हणजेच देशी अंड्याची किंमत जवळपास 11 रुपये इतकी झाली आहे.


पावसाचा जोर वाढल्यामुळे वातावरणात गारवा वाढल्याने अंडी खाण्याकडे लोकांचा कल वाढल्याने अंड्यांची मागणी अचानक वाढली. तसेच पावसाळा असल्याने मासे आणि चिकन यांच्या दरांमध्येही वाढ झाल्याने नागरिकांनी पर्याय म्हणून अंड्याला पसंती दिल्याने अंड्यांची मागणी अचानक वाढल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.


सध्या मुंबई आणि उपनगरात दिवसाला 80 ते 90 लाख अंड्यांची गरज असते. मात्र मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत असल्याने अंड्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.